
निवडणूक आयोगाविरोधात काढण्यात आलेल्या इंडिया आघाडीच्या मोर्चाला आज (11 ऑगस्ट) संसद परिसरातच रोखण्यात आले. बिहारमधील मतदार पडताळणी आणि निवडणुकीत मत चोरीच्या आरोपांवरून संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत 300 विरोधी खासदारांनी मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता.
यादरम्यान, राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी खासदारांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना संसद पोलिस ठाण्यात नेण्यात आले. दिल्ली पोलिसांनी परवानगी नसल्याचे सांगत निवडणूक आयोगाकडे जाऊ दिलं नाही.
◼️ बॅरिकेडची भिंत उभा करत खासदारांना संसद परिसरातच रोखण्यात आले. यावेळी अनेक महिला खासदारांनी सुद्धा बॅरिकेड भेदून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही खासदारांसोबत धक्काबुकी झाल्याचा आरोपही करण्यात आला.
दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर विरोधकांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. हे सरकार डरपोक असल्याचा हल्लाबोल यावेळी तिथे करण्यात आला.