
केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणामध्ये मध्य प्रदेशमधील इंदूरने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. इंदूरने सलग आठव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान पटकावला आहे. तर या क्रमवारीत गुजरातमधील सूरत हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहे. महाराष्ट्रातील नवी मुंबई शहराने देशातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे.
केंद्र शासनातर्फे राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2024 या राष्ट्रीय स्वच्छता स्पर्धेमध्ये पिंपरी-चिंचवड शहराने देशात सातवा क्रमांक पटकावला आहे. तर, राज्यात पहिला क्रमांक आला आहे. तसेच या वर्षी महाराष्ट्रातील विटा व पाचगणीचाही समावेश आहे. ही अनुक्रमे 20 हजार ते 50 हजार लोकसंख्या आणि 20 हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या श्रेणीतील शहरांमध्ये सर्वात स्वच्छ शहरे ठरली आहेत.
मुंबईच्या कामगिरीत किंचित सुधारणा झाली असून शहराचा 33 वा क्रमांक आला. या आधी मुंबई 37 व्या स्थानी होती. राष्ट्रीय स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राला 10 पुरस्कार मिळाले. दिल्लीत झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 78 महापालिका, नगरपालिकांना स्वच्छतेसाठीच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. तसेच केंद्र सरकारच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षणामध्ये पनवेल महानगरपालिकेने बाजी मारली आहे.
स्वच्छता सर्वेक्षणाचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये विविध वर्गवारीनुसार स्वच्छ शहरांची घोषणा करण्यात आली. यात इंदूर, सूरत आणि नवी मुंबई या शहरांनी बाजी मारली. त्याशिवाय तीन ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या गटामध्ये उत्तर प्रदेशमधील नोएडा या शहराने पहिला क्रमांक पटकावला. या गटामध्ये चंडीगड दुसऱ्या आणि म्हैसूर तिसऱ्या क्रमांकावर राहिले.



