
कोपरगाव : येथील मतदार संघात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या (Drought conditions) पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी आपल्या गावी माहेगाव देशमुख येथे ग्रामदैवत श्री दत्त मंदिरात महापूजा केली. तसेच यावेळी कोपरगाव मतदार संघात भरपूर पाऊस पडावा व दुष्काळाचे सावट हटू दे असे दत्त महाराजांना साकडे घातले.
कोपरगाव मतदार संघ पर्जन्य छायेखाली येत असल्यामुळे दरवर्षी मतदार संघात इतर तालुक्याच्या तुलनेत पर्जन्यमान कमी असते. परंतु राज्यात यावर्षी सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोपरगाव मतदार संघात देखील दुष्काळाच्या परिस्थितीमुळे सोयाबीन,बाजरी,मका,कापूस,तुर,मका आदी खरीप पिकांचे मोठे नुकसान होवून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्याचबरोबर रब्बी हंगामाचे भवितव्य देखील टांगणीला लागले आहे. याच पार्श्वभूमीवर कोपरगाव मतदार संघासह दुष्काळी परिस्थिती असलेल्या सर्व भागात वरून राजाने कृपा करावी व दुष्काळाचे सावट दूर व्हावे, यासाठी माहेगाव देशमुख येथे श्री दत्त मंदिरात महापूजा करून कोपरगाव मतदार संघात भरपूर पाऊस पडावा, यासाठी आमदार आशुतोष काळेंनी साकडे घातले.
मतदार संघात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती चिंताजनक असून याचा सर्वच घटकांवर परिणाम होत आहे. खरीप पिके जळाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर बाजारपेठेत देखील शुकशुकाट निर्माण झाल्यामुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. सर्व सामान्य नागरिकांना देखील या दुष्काळी परिस्थितीची झळ बसली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी केलेली सामूहिक प्रार्थना वरुणराजा नक्की ऐकेल व यापुढील काळात कोपरगाव मतदार संघात समाधानकारक पाऊस होवून सर्वच घटकांना सुख समाधान लाभेल असा आशावाद काळे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी माहेगाव देशमुख व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.