
नगर ः नगर-मनमाड रस्त्यावर लूटमारी करणाऱ्या चार सराईत आरोपी (Accused) एमआयडी पोलिसांनी (Police) काल (गुरुवारी) जेरबंद केले. नागेश संजय चव्हाण (रा. मोबीन आखाडा, ता. राहुरी), अक्षय उत्तम माळी, संकेत सोपान बडे, किरण राजेंद्र जगधने (तिघेही रा. झोपडपट्टी, राहुरी) अशी जेरबंद (Imprisoned) आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून एक लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
अनिल म्हस्के हे विळद परिसरातील पाण्याच्या टाकीजवळून दुचाकीवर जात असताना पाठीमागून दोन दुचाकीवर चार जण आले. त्यांनी जिवे मारण्याची धमकी देत म्हस्के यांची एक लाख रुपये किमतीची दुचाकी व 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल घेऊन पोबारा केला. या संदर्भात म्हस्के यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी रस्तालुटीचा गुन्हा दाखल करून घेतला होता.
या प्रकरणातील आरोपींबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांना माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी राहुरीत पथक पाठविले. या पथकाने सापळा रचून आरोपींना जेरबंद केले. आरोपींकडून चोरीचा मद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींपैकी किरण जगधने हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत.