आरे देवा.! मास्तर शाळा सोडून चक्क दारु विकतो.! पोलिसांनी कारवाई केली तर म्हणे मी आत्महत्या करेल.! 4 लाखांच्या मुद्देमासह दोघांना बेड्या.!

आरे देवा.! मास्तर शाळा सोडून चक्क दारु विकतो.! पोलिसांनी कारवाई केली तर म्हणे मी आत्महत्या करेल.! 4 लाखांच्या मुद्देमासह दोघांना बेड्या.!

            
राजूर :-   अकोले तालुक्यात ज्या राघोजी भांगरे यांनी आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यात जो इतिहास रचला ती संस्कृती जतन करण्याचे काम तेथील बांधवांनी केले आहे. मात्र, काही लोक त्यास काळीमा फासण्याचे काम करीत असून पर्यटनाला गालबोट लागेल तसेच पर्यटकांना मद्यधुंद करण्याचे काम काही लोक करताना दिसत आहेत. कारण, भंडारदरा परिसरातील मुरशेत येथे एक शिक्षकच चक्क दारुचा साठा करुन तो पर्यटकांच्या गळी उतरविताना मिळून आला आहे.

हा प्रकार जेव्हा राजुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या लक्षात आला असता त्यांनी थेट या शिक्षकाच्या टेंट हाऊसवर धाड टाकत चार लाख दहा हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर, याप्रकरणी भगवान भागा अस्वले (रा. मुरशेत. ता. अकोले) व राम भाऊ रगडे (रा. साम्रद, ता. अकोले) अशा दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. यात धक्कादायक प्रकार असा की, या शिक्षकावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता त्याने तेथे भलताच नंगानाच केला. तुम्ही जर माझ्यावर कारवाई केली तर मी आत्महत्या करेल अशी धमकीच पोलिसांना दिली. म्हणजे चोर तर चोर वरुन शिरजोर या म्हणीचा प्रत्येय येथे आला. मग काय! पोलिसांनी ताब्यात घेऊन दोघांवर प्रविण थोरात यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की भंडारदरा येथे सरत्या वर्षाला निरोप देत नविन वर्षाच्या स्वागतासाठी हजारो पर्यटक भंडारदरा येथे येत असतात. या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, किंवा पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा धोका पोहचू नये यासाठी राजुर पोलिस 31 डिसेंबरच्या मध्यरात्री पेट्रोलिंग करत असतात. या दरम्यान, भंडारदरा परिसरात मुरशेत येथील एका टेंट हाऊस पासून हे पोलीस जात असताना त्यांना काही शंका आली. या ठिकाणी अवैध रित्या दारुची विक्री करुन पर्यटकांना ती अव्वाच्या सव्वा भावात विकली जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर राजुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितिन पाटील यांनी तात्काळ कारवाई करत संबंधित टेंटची तपासणी केली. यावेळी, पोलीस आणि आरोपी यांच्यात चांगलीच शब्दीक चकमक झाली. मात्र, अवैध धंद्यावाल्यांना पळता भुई थोडी करणारे पाटील या मास्तरला पाठीशी घालतील तरी कसे? त्यांनी टेंटमध्ये घुसून झडती घेतली असता त्यात दारुचे पोते मिळून आले. यावेळी कारवाई करताना येथे एकूण चार लाख दहा हजार रुपयांचा किंमती दारुचे दोन बॉक्स व मारुती सुझुकी कंपनीची बलेनो गाडी ताब्यात घेण्यात आली.

दरम्यान, यावेळी या टेंटच्या मालकाने राजुर पोलिसांना धमकी देत कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जर माझ्यावर कारवाई केली तर मी आत्महत्या करेल. विशेष म्हणजे हा टेंटचालक एक शिक्षक असून, अशा जबाबदार व्यक्तीने असे कृत्य करणे हे सामाज व्यवस्थेचे दुर्दैव आहे. एकीकडे शाळा सुरू होण्यासाठी विद्यार्थी चातकाप्रमाणे शाळेचा गेट उघडण्याची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे काही शिक्षक आपल्या फावल्या वेळेत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिकवण्या घेत आहेत. तर तिसरीकडे काही शिक्षक पर्यटकांना मद्यधुंद करण्यात आपला वेळ घालवत पैसा कमविण्याच्या नादात मशगुल आहेत.

यात आणखी एक दुर्दैव की, कारवाई करताना एका शिक्षकाने पोलिसांना धमकी द्यावी.! ती ही मद्य विकताना.! हे सर्व आजकाल हॉरीबल वाटू लागले आहे. कोणी काहीही धमकी दिली तरी राजुर पोलिसांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता भगवान भागा अस्वले (रा. मुरशेत. ता. अकोले) व राम भाऊ रगडे (रा. साम्रद, ता. अकोले) अशा दोघांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. त्यामुळे, राजुर पोलिसांचे नागरिकांनी कौतुक केले आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, पोलीस उपाधिक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील पोलीस उपनिरीक्षक नितिन खैरनार, पो.हे.कॉ. भाऊसाहेब आघाव, पो.कॉ.प्रविण थोरात, अशोक गाडे, पांडुरंग पटेकर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here