
नगर : जिल्ह्यात ‘आयुष्मान भव’ (Ayushman Bhava) मोहिमेला १ सप्टेंबरपासून सुरुवात झाली. ही मोहीम ३१ डिसेंबरपर्यंत चालू राहणार आहे. या माध्यमातून दुर्धर आजारावर (terminal illness) उपचार करता येणार आहे. या माेहिमेंतर्गत लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंतच्या ३२ आराेग्य तपासण्या माेफत (Free health checks) करण्यात येणार आहे. या योजनेचा ग्रामीण भागातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नगर जिल्ह्यात ग्रामीण भागात आयुष्यमान भव ही माेहीम राबविण्यासाठी आशा सेविकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आशा सेविकांमार्फत लाभार्थ्यांना तातडीने आयुष्यमान याेजनेचे कार्ड काढून देण्यात येत आहे.
लहान मुलांमधील जन्मजात आजार, डोळे, कान, नाक, घसा अशा विविध प्रकारच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. अंगणवाडी व प्राथमिक शाळांमध्ये या तपासण्या केल्या जात आहेत. ज्येष्ठांच्या वाढत्या वयातील आजारांच्याही तपासण्या केल्या जात आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.