
आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंना जीवे मारण्याची खुलेआम धमकी दिल्याने राहुरी ख्रिस्ती समाजात भीतीचे वातावरण आहे. समाजाने त्यांच्या आमदारकीवर कारवाईसह पोलीस संरक्षणाची मागणी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.राहुरी- शहरात ख्रिस्ती समाजाने भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात तीव्र निषेध व्यक्त करत त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कुपवाड येथील ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्येनंतर आयोजित सभेत पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंना जीवे मारण्याची धमकी दिली आणि ख्रिस्ती समाजाबद्दल अपमानास्पद वक्तव्ये केल्याचा आरोप आहे. या वक्तव्यांमुळे ख्रिस्ती समाजात भीतीचे वातावरण पसरले असून, राहुरीतील ख्रिस्ती बांधवांनी २३ जून २०२५ रोजी तहसीलदार नामदेव पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवसकर यांना निवेदन सादर करून कारवाईची मागणी केली आहे.
पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा संदर्भ..
सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणानंतर आयोजित मशाल मोर्चादरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंविरोधात आक्षेपार्ह विधाने केली. त्यांनी “धर्मांतरासाठी गावात येणाऱ्या ख्रिस्ती पाद्रींना सैराट करा, आणि जो हे करेल त्याला मी स्वतः ११ लाखांचे बक्षीस देईन” असे वक्तव्य केले, ज्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली. याशिवाय, त्यांनी धर्मगुरूंना “ठोकून काढा” असे आवाहन केले, ज्यामुळे ख्रिस्ती धर्मगुरूंच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा आरोप राहुरीतील ख्रिस्ती समाजाने केला आहे. या वक्तव्यांचा संदर्भ देत राहुरीतील ख्रिस्ती बांधवांनी पडळकर यांच्या विधानांना समाजात तेढ निर्माण करणारे आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे ठरवले आहे. त्यांनी या प्रकरणातील सत्य उघड करण्यासाठी सीआयडी चौकशीची मागणीही केली आहे.





