नवी दिल्ली – निवडणूक आयोग (Election Commission) लवकरच मतदान कार्ड हे डिजिटल स्वरुपात ( Digital Voter Cards) घेऊन येण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मतदान कार्ड (Voting Card) आता आधार कार्डप्रमाणे डिजिटल स्वरुपात जवळ ठेवता येणार आहे. सध्याच्या मतदान कार्डहोल्डर्सना हेल्पलाईन अॅपच्या माध्यमातून केवायसी (KYC) केल्यानंतर ही सुविधा उपलब्ध होईल. निवडणूकआयोगाचा मतदारांना ‘इलेक्टर्स फोटो आयडेंटिटी कार्ड’ (EPIC) ही सुविधा सहज उपलब्ध करून देणं हा हेतू आहे.
निवडणूक आयोगाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर, नवीन मतदार इंटरनेटवरून आपलं मतदान कार्ड डाऊनलोड करू शकणार आहेत. तसेच या डिजिटल कार्डच्या माध्यमातून ते त्यांचा मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. याशिवाय मतदान कार्ड मिळण्यासाठी लागणारा उशीर आणि त्यामुळे होणारा त्रासही कमी होणार आहे. यासोबतच निवडणूक आयोगाच्या नोंदींमध्ये असलेल्या मतदारांनाही याचा फायदा होणार आहे. या निर्णयानंतर मतदार डिजिटल स्वरूपात EPIC डाऊनलोड करू शकणार आहेत.