आता कार्यालयीन वेळेआधीच मिळणार शिकाऊ लायसन्स
सकाळी साडेसात वाजता म्हणजेच कार्यालयीन वेळेच्या दोन तास अगोदर शिकाऊ लायसन्स देण्याचा निर्णय पुणे परिवहन कार्यालयाच्या वतीने घेण्यात आला आहे.
यापूर्वी पुणे परिवहन कार्यालय येथे शिकाऊ लायसन्स परवाना मिळण्यासाठी नागरिकांना चार ते सहा महिने कालावधी वाट बघावी लागत असे पण आता पुणेकर वाहन चालकांनी शिकाऊ परवाना मिळण्यासाठी अर्ज केला तर किमान एक ते दोन दिवसात त्यांना पूर्वनियोजित वेळ मिळाली पाहिजे, असा परिवहन अधिकारी अजित शिंदे यांचा मानस आहे.
पुणेकर नागरिकांना शिकाऊ परवाना देण्यासाठी परिवहन अधिकारी अजित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे कार्यालयातील परिवहन योद्धाही कार्यरत आहेत.
या निर्णयामुळे दररोज अतिरिक्त 300 ते 400 वाहनचालकांना शिकाऊ परवाना मिळणार असून एका दिवसात 700 शिकाऊ परवाना देण्याचा विक्रम पुणे परिवहन कार्यालय पुणे यांच्याकडून नोंदवण्यात येणार आहे. तसेच या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्य एका दिवसात सर्वात जास्त शिकाऊ परवाना देणारे परिवहन कार्यालय म्हणून ऐतिहासिक नोंद होऊ शकणार आहे.
या निर्णयाचे पुणे शहर मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे यांनी स्वागत केले असून परिवहन विभागाच्या या उपक्रमात असोसिएशन सकाळी दोन तास अगोदर साडेसात वाजता पूर्वनियोजित वेळ घेऊन मोटार ड्रायव्हिंग स्कूलमधून आलेल्या वाहनचालकांच्या शिकाऊ लायसन्ससाठी संपूर्ण सहकार्य करेल, असेही त्यांनी जाहीर केले.