
जालना: ज्या गावातून मराठा आंदोलनाचे रूप व्यापक झाले त्या आंतरवली सराटी येथे आता मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासह अन्य मागण्यांसाठीं ओबीसी आंदोलकांनी सोमवारपासून उपोषणास सुरुवात केली.
बाबासाहेब बटुळे, बाळासाहेब दुखणे, विठ्ठल तळेकर, श्रीहरी निर्मल यांचा उपोषणात सहभाग आहे. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती रद्द करण्यात यावी, त्याचप्रमाणे देण्यात आलेली ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावीत, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचे मुंबईत उपोषण सुरू असताना त्याच वेळी अंतरवाली सराटी गावात ओबीसी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
ओबीसी आंदोलकांनी अंतरवाली सराटी येथे उपोषणासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. त्यासाठी काही अटींची पूर्तता करून पुनश्च अर्ज सादर केल्याशिवाय परवानगी देण्याबाबत पुढील निर्णय घेणे शक्य होणार नाही, असे पौलिसांनी म्हटले होते. उपोषणास बसण्याच्या ठिकाणच्या जागामालकाचे ना हरकत प्रमाणपत्र परवानगी मागणाऱ्या अर्जासोबत जोडलेले नाही, उपोषणास किती लोक बसणार आहेत, त्यांची नावे व पत्ते आणि मोबाइल क्रमांक सादर केलेले नाहीत, आंदोलनास भेट देण्यासाठी येणाऱ्यांची वाहने उभे करण्याच्या नियोजनाची माहिती अर्जासोबत सादर केलेली नाही, असे आक्षेप पोलिसांनी घेतले होते.