अहमदनगर शहरामध्ये आज पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावलेली
गेल्या दोन दिवसापासून नगर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज सुद्धा नगर शहरामध्ये दुपारनंतर जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणी पाणी झाले होते. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झालेला होता.
हवामान खात्याने येत्या पाच दिवसांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. जिल्ह्यामध्ये बहुतांश तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता. जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला होता. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देऊन पाथर्डी शेवगाव येथील लोकांना अन्य ठिकाणी सुद्धा स्थलांतरित करण्यात आले होते. मागच्या आठवड्यामध्ये शेवगाव, पाथर्डी तालुक्यामध्ये पावसाने मोठे नुकसान केलेले आहे. अनेक ठिकाणी शेती उद्ध्वस्त झालेली आहे. या ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते.
नगर शहरामध्ये आज पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. सकाळपासूनच वातावरणामध्ये उष्मा मोठ्या प्रमाणात जाणवत होता. त्यातच आज दुपारनंतर नगर शहरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. शहरातील केडगाव भिंगार एमआयडिसी या विविध क्षेत्रांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे सर्वत्र पाणी पाणी झाले होते. नगर शहरामध्ये दोन ठिकाणी घरांची पडझड झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर अनेक ठिकाणी आजच्या पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झालेला होता.