
भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) आणि राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने 26 आणि 27 जुलै 2025 रोजी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, घाटमाथा, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या कोकणातील जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईत आज दुपारी 12.35 वाजता 4.8 मीटर उंचीची भरती येणार आहे. यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला असून किनारपट्टीवरील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. कोल्हापूर आणि सांगलीतही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असून, नाशिकमध्ये पावसाचा जोर अधिक आहे.




