आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात महिला असुरक्षित; भाजपचा आरोप

अहमदनगर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला असुरक्षित आहेत, असा आरोप भाजपच्या महिला आघाडीने केला आहे. राज्यातील विविध भागात महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ दिल्लीगेट वेशीजवळ धरणे आंदोलन करीत भाजप महिला आघाडीने राज्य सरकारचा निषेध केला. 
कोविडच्या महामारीतही राज्यातील महिलांवरील अत्याचार थांबलेले नाहीत, कोव्हीड सेंटरमध्ये कोरोना बाधित मुलीवर अत्याचार होत आहेत तर राज्यातील नांदूरा, जालना, करंजे विहिरे, रोहा, मुंबई, गोरेगांव, पाबळ, पनवले, कोल्हापुर, औरंगाबाद अशा सर्वच ठिकाणी महिलांवरील अत्याचाराचे प्रकार घडले आहेत. राज्यातील महिलांवरील अत्याचार थांबण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही नवीन कायदा करण्याचे जाहीर केले होते. मात्र, अद्याप निर्णय घेतला नाही. महिलांवरील अत्याचारांची दखलही हे सरकार घेत नाही. मग या आघाडी सरकारचा आपल्याला उपयोग काय?, असा सवाल भाजप महिला आघाडीने केला आहे. 
दक्षिण विभागाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी थोरात व जिल्हा सरचिटणीस सुरेखा विद्ये यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सरचिटणीस वंदना पंडित, कॅन्टोंन्मेंट सदस्या शुभांगी साठे, माजी नगरसेविका संगीता खरमाळे, प्रिया जानवे, नगरसेविका पल्लवी जाधव, पंचायत समिती सदस्या स्वाती कराळे, अरणगावच्या सरपंच स्वाती गहिले, रेश्मा शेख, नंदा चाबुकस्वार, अर्चना चौधरी, मनीषा गहिले, ज्योत्स्ना मुंगी, संगीता मुळे या महिला पदाधिकार्यांसह भाजपा शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, अजय चितळे, महेश तवले, विवेक नाईक, अनिल गट्टाणी, तुषार पोटे, राजेंद्र विद्ये सहभागी झाले होते.
राज्यामध्ये राज्य महिला आयोग व बाल हक्क आयोगाची अध्यक्षपदे अद्यापही रिक्त आहेत. त्यामुळे अत्याचारित महिलांनी दाद मागायची कोणाकडे, असा सवाल या आंदोलनात व्यक्त करण्यात आला. शहर व जिल्हा भाजपा महिला आघाडीच्यावतीने महिला सुरक्षेचा नवीन कायदा त्वरित लागू करण्याची मागणी राज्य सरकारकडे यावेळी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here