
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा ; ओढे- नाल्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
शिर्डी, दि. २२ – कोल्हार, हनुमंतगाव, पाथरे व पंचक्रोशीतील गावांमध्ये पावसामुळे झालेल्या शेतीपीकांच्या नुकसानीची तातडीने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, तसेच ओढे-नाल्यांवरील अतिक्रमण कोणालाही पाठीशी न घालता एका महिन्यात हटविण्याचे सक्त निर्देश जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
अतिवृष्टीमुळे भगवतीपूर, पाथरे, हनुमंतगाव या परिसरात शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अतिक्रमणामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवला गेल्याने पाणी शेतात घुसल्याचे निदर्शनास आले.
या पार्श्वभूमीवर नुकसानीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, कृषी, जलसंपदा, बांधकाम यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची लोणी येथे बैठक झाली.
बैठकीस शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, राहाता तहसीलदार अमोल मोरे, कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्रीनिवास वर्षे, जलसंपदा विभागाचे स्वप्निल काळे आदी अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्शिन होते.
अतिक्रमणामुळे झालेल्या नुकसानीबाबत पालकमंत्र्यांनी महसूल व जलसंपदा विभागाला संयुक्त पाहणी करून तातडीने ओढे-नाले अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश दिले. आवश्यक असल्यास मोजणी करून कार्यवाही करावी, कोणतेही अतिक्रमण सहन केले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अनधिकृत प्लॉट विक्रीच्या तक्रारींच्या अनुषंगाने कोल्हार व लोणी खुर्द येथील प्लॉट व्यवहारांची पुन्हा तपासणी करावी, नियमांनुसार सर्व तरतुदी पूर्ण झाल्याची खात्री करूनच व्यवहार करण्यात यावेत, असे निर्देश प्रांताधिकारी व तहसीलदारांना देण्यात आले.
कृषी विभागाने सरसकट पंचनामे करावेत तसेच ई-पिक पाहणीतील मर्यादाही लक्षात घ्याव्यात. ज्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतलेला नाही अशा शेतकऱ्यांना शासन नियमांनुसार मदत मिळेल यासाठी प्रयत्न करावेत, असेही मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
वन विभागाने बिबट्याच्या वाढत्या हालचालींवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात, पिंजरे उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करावा, निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.
पशुसंवर्धन विभागाने लंपी साथीबाबत गांभीर्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.