अहमदनगर : राज्यातील सर्व दुकाने, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सरकारने मुभा दिली आहे. १५ ऑगस्टपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. याबाबत एक-दोन दिवसांत विस्तृत आदेश जारी केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.
महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने विविध उपाययोजना सुरु आहेत. नगर जिल्हा ३ मध्ये आहे. त्यामुळे । गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवार या पाच दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सर्व प्रकारचे व्यवहार सुरू ठेवण्यास मुभा दिली होती. मात्र, शनिवार व रविवार या दोन्ही
दिवशी कडक लॉकडाऊन सुरू आहे. अनेक दिवसांपासून दुकाने व इतर व्यवहारावर निर्बंध लागू केल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे त्यांनी व हॉटेलचालकांनी वेळ वाढवून देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली होती. राज्य सरकारने या मागणीची दखल घेत, १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनापासून सर्व प्रकारची दुकाने, हॉटेल्स, मंगल कार्यालये, शॉपिंग मॉल्स काही अटीवर रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात मुभा दिली असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. तसा आदेशही राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, नगर जिल्हा स्तर ३ मध्ये असल्याने, हे आदेश जिल्ह्यासाठी लागू आहेत का, याबाबत हॉटेलचालक, व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. नगर जिल्ह्यातही रात्री १० वाजेपर्यंत व्यवहार सुरु राहतील का, अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी गुरुवारी आदेश काढलेला नाही. त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण झालेला आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले की, हा आदेश जिल्ह्यासाठीदेखील लागू आहे. १५ ऑगस्टपासून याची अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी येत्या एकदोन दिवसांत आदेश काढला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.