
नगर : नगर (Ahmednagar) तालुक्यामधील नारायण डोह शिवारातील एका नामवंत स्कूलमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या चौथीच्या विद्यार्थ्याचे मुख्याध्यापिकेकडून मानसिक, शारीरिक, सामाजिक शोषण होत असल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भातील तक्रार खुद्द नगर तालुका पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी बाबूराव जाधव यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करून योग्यती कारवाई करण्याची विनंती तक्रार अर्जात केली आहे.
खासगी शाळांत गरीब विद्यार्थ्यांनाही शिक्षण घेता यावे यासाठी सरकारने आरटीई अंतर्गत खासगी शाळांना प्रवेश कोटा राखून ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आरटीईच्या जागा सरकार प्रवेश प्रक्रिया राबवून भरत असते. नारायण डोह परिसरातील एका खासगी शाळेतही अशाच पद्धतीने एका मुलाला इयत्ता चौथीत प्रवेश मिळाला होता. मात्र, आरटीई प्रवेश असल्याने शाळेतील मुख्याध्यापिकेकडून मानसिक, शारीरिक, सामाजिक शोषण केले जात आहे. मुलाला खोलीत डांबून ठेवण्यात आले तसेच जातीय वाचक उल्लेख करण्यात आला, असा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे. त्यांनी या संदर्भात गटशिक्षणाधिकारी जाधव यांच्याकडे तक्रार केली होती. तसेच या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गजानन भांडवलकर यांनीही शाळेबाबत तक्रार केली होती.
प्राप्त तक्रारीनुसार गटशिक्षणाधिकारी जाधव यांनी नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी तक्रार अर्ज दिला आहे. या अर्जात त्या खासगी शाळेत विद्यार्थ्याचे शोषण होते आहे अथवा नाही याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.




