
नगर ः मारहाण करून लुटणाऱ्या टोळीची तीन वर्षांनंतर उकल करण्यात नगर (Ahmednagar) येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळाले आहे. या घटनेला अनैतिक संबंधाची किनार असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी स्वप्निल सुनील वाकचौरे (वय 24, रा. प्रबुद्धनगर, भिंगार), अशोक नामदेव जाधव (वय 40, रा. शाहुनगर, केडगाव, नगर), प्रताप सुनील भिंगारदिवे (वय 27), विशाल लक्ष्मण शिंदे (वय 37, दोन्ही रा. सावतानगर, भिंगार, नगर), रवींद्र विलास पाटोळे (वय 33, प्रबुद्धनगर, भिंगार, नगर) अशी जेरबंद पाच आरोपींची नावे आहेत. तर दोन आरोपी पसार आहेत.
पोलीस प्रशासनाकडून हद्दपार करूनही जिल्ह्यात असलेल्या आरोपींचा शोध घेऊन कारवाई केली जात आहे. अशातच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की, स्वप्निल वाकचौरे हा हद्दपार आरोपी चोरीची मोपेड घेऊन त्याच्या घरी आला आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला जेरबंद केले. त्याला या दुचाकी विषयी विचारले असता त्याने तीन वर्षांपूर्वी संदीप मच्छिंद्र वाघ यांना मारहाण करून ही मोपेड आणल्याचे सांगितले. या कामासाठी त्याला अशोक जाधवने सुपारी दिली होती. त्यानुसार पथकाने अशोक जाधव व स्वप्निलचे तीन साथीदार ताब्यात घेतले. अशोक जाधवने अनैतिक संबंधातून संदीप वाघला मारण्याची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या टोळीतील रवींद्र धिवर व संदीप पाटोळे हे आरोपी पसार आहेत.
जेरबंद आरोपींविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पुढील तपासासाठी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. जेरबंद आरोपींपैकी चार आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. यापूर्वी स्वप्निल वाघचौरेवर आठ, अशोक जाधव याच्यावर दोन, प्रताप भिंगारदिवेवर पाच तर विशाल शिंदेवर तीन गुन्हे दाखल आहेत.