
विधानसभा निवडणुकीच्या अनुशंघाने सध्या सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अगदी निवडणुकीच्या तोंडावर महायुती किंवा आघाडी राहील की नाही हे सध्या तरी सांगता येणे अवघड आहेत. महायुतीचा विचार केला तर त्यात अहमदनगर जिल्ह्यातील एकंदरीत इच्छुकांची संख्या पाहता महायुती राहील कीर नाही अशी शंका येते. दरम्यान आता मागिल काही दिवसांपासून नगर शहरातील महायुतीमधील वातावरण आलबेल आहे असे दिसत नाही. त्याचे कारण असे की नगर शहरात भाजपने आपलाच उमेदवार असावा असे म्हटले होते. त्यासाठी पंकजा मुंडे यांना उभे करावे असे म्हटले जात होते. परंतु त्यांना विधान परिषदेवर घेतले आणि हा विषय संपला. आता भाजप पदाधिकाऱ्यांनी शहरातून माजी खा. सुजय विखे यांना आमदारकीसाठी उभे करावे अशी मागणी केली आहे. कुणी केली ही मागणी? जगतापांचा पत्ता कट करून विखेंना उमेदवारी मिळू शकते का? की जगताप – विखे फाईट होईल?
निष्ठावंतांच्या मागणीला पक्षातूनच बळ मिळेनासे झाले. आता शिरस्थ नेतृत्वाने सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. युतीच्या भानगडीने संख्या बळाचा आकडा २३ वरुन ९ आला याचाच अर्थ निवडून आलेल्या उमेदवारापेक्षा पराभूत दुप्पट झाले हेच युतीचं फलित. मागील विधानसभेत १२३ वरून १०५ वर संख्या आली, ही घसरण कशामुळे झाली? घडामोडी, पाडापाडी, तडजोडी हा युतीचा मुलभूत पाया आहे. त्यात आपण अडकलो तर नाहीना याचा विचार झाला पाहिजे. वस्तुतः घटक पक्षाशी अनावश्यक तडजोडी करण्याची गरज नव्हती. त्या तडजोडीतून पडझडच जास्त झाली. अनावश्यक व धोकादायक घटकपक्ष दूर केले पाहिजेत. निवडणूक निकालानंतर त्यावर चर्वितचर्वण करणे योग्य नाही. तेव्हा घटक पक्षातून सावध होऊन आपला स्वबळाचा संसार थाटणे अधिक शहाणपणाचे ठरेल.
अन्यथा विधानसभेला इतिहासाची पुनरावृत्ती होईल, असा इशारा भाजपचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अनिल गट्टाणी यांनी दिला आहे.अहमदनगर शहराचा विचार केला असता विधानसभेसाठी अत्यंत दयनीय परिस्थिती आहे. स्वातंत्र्योत्तर कालापासून आजपर्यंत शहराल भाजपला आमदार मिळाला नाही, हे दुर्दैव आहे. भयमुक्त नगर या गोंडस घोषणेखाली गेली २५-३० वर्षे दुसऱ्याचीच पालखी उचलली त्यामुळे शहर उमेदवारीसाठी पक्षातीलच पदाधिकारी बाहेरचा उमेदवार सुचवू लागले. स्वपक्षात सक्षम उमेदवार करण्यास पक्षाला सपशेल अपयश आले. सत्तेपेक्षा संख्या बळावर लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे. आता निदान शहरातील भय, दहशतवाद यांचे उच्चाटन करायचे असेल तर आपल्या पक्षाचाच उमेदवार निवडून आला पाहिजे.