अमरावतीमध्ये तरुणीच्या गुप्तांगामधून स्वॅब घेण्याचा धक्कादायक प्रकार;
आरोपीने तरुणीला युरिनल चाचणी करावी लागेल सांगत गुप्तांगातून घेतले होते स्वॅबचे नमुने
कोर्टाने आरोपीला सुनावली १० वर्षांची शिक्षा
अमरावतीमध्ये तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेण्यात आल्याची धक्कादायक घटना दीड वर्षांपूर्वी घडली होती. अमरावतीमधील मोदी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये घडलेल्या या घटनेनंतर संताप व्यक्त करण्यात आला होता. टेक्निशियन असणाऱ्या आरोपी अलकेशने तरुणीच्या घशातील स्वॅबचे नमुने घेतल्यानंतर गुप्तांगातूनही स्वॅबचे नमुने घेतल्याचा आरोप झाला होता.
तरुणीने केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या. दरम्यान आता याप्रकरणी कोर्टानेही महत्वाचा निकाल दिला आहे.
आरोपी अलकेशविरोधातील गुन्हा सिद्ध झाल्यानंतर कोर्टाने त्याला दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
आरोपी अलकेशविरोधात बडनेरा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.
प्रकरण काय आहे:
ऑफिसमधील सहकाऱ्याला करोनाची लागण झाल्याने २८ जुलै २०२० रोजी तरुणी करोना चाचणीसाठी गेली होती. नोकरीनिमित्ताने अमरावतीमधील आपल्या भावाकडे ती राहत होती.
तिच्यासोबत इतरांचीही करोना चाचणी करण्यात आली होती. पण नंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगत तिला परत बोलावण्यात आलं.
आरोपीने तरुणीला युरिनल चाचणी करावी लागेल असं सांगितलं. यावेळी तरुणीसोबत तिची महिला सहकारीदेखील होती. त्यांनी महिला कर्मचारी आहेत का ? असं विचारलं असता आरोपीने नकार दिला.
यानंतर त्याने गुप्तांगातून स्वॅब घेतले आणि रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं सांगितलं. पण अशा पद्धतीने गुप्तांगातून नमुने घेतल्याबद्दल शंका आल्याने तरुणीने आपल्या भावाला सांगितलं.
यानंतर त्यांनी डॉक्टरांकडे चौकशी केली असता त्यांनी अशा पद्धतीने नमुने घेत नसल्याचं सांगितलं.
नंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. पोलिसांनी तपासानंतर अलकेशला बेड्या ठोकल्या होत्या.
या तरुणीचा स्वॅब घेतेवेळी तिच्याशी अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक २) व्ही. एस. गायकी यांच्या न्यायालयाने अल्केश अशोकराव देशमुख (३२, रा. पुसदा) या आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास, १५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.
दुपारी बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील मोदी ट्रॉमा केअर रुग्णालयात २८ जुलै २०२० रोजी सदर घटना घडली होती.
तपासाअंती आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात न्यायालयात १२ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली.
साक्षीदारांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश व्ही. एस. गायकी यांच्या न्यायालयाने अल्केश देशमुख याला १० वर्षे सश्रम कारावास, १५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सुनील अ. देशमुख यांनी यशस्वी युक्तीवाद केला.
बडनेरा येथील एका कंत्राटी टेक्निशियनने करोना चाचणी करतो असं सांगत युवतींच्या गुप्त अंगातून स्वॅब घेतल्याचा प्रकार घडला होता.
या घटनेने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली होती.




