अनिल देशमुख यांच्या नागपुरातील संबंधित काही ठिकाणांवर ईडीचा छापा
नागपूर – ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात आपल्या कारवाईचा फास अधिकाधिक आवळायला सुरुवात केली आहे. एकीकडे ईडीने वारंवार चौकशीसाठी नोटीस बजावून देखील अनिल देशमुख उपस्थित रहात नसताना दुसरीकडे अनिल देशमुख यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीने छापेमारी सुरूच ठेवली आहे.
ईडीने आज दुपारी अनिल देशमुख यांच्या नागपुरातील येथील महाविद्यालयावर छापा टाकल्याची माहिती मिळते आहे. त्याचबरोबर नागपुरातील अनिल देशमुख यांच्याशी संबंधित इतर काही ठिकाणांवर देखील ईडीने छापे टाकल्याचे वृत्त एएनआयने दिली आहे.
शुक्रवारी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मार्गावर असलेल्या माऊरझरी येथील नागपूर इन्सिटट्युट ऑफ टेकनॉलॉजी (एनआयटी) महाविद्यालयावर ईडीने छापे टाकल्यामुळे आता देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आत्तापर्यंत चार वेळा अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावून देखील ते अजूनही चौकशीसाठी हजर राहिलेले नाहीत. ईडीने बजावलेल्या चौथ्या समन्सनंतर देखील राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सोमवारी चौकशीला गैरहजर राहिल्यामुळे
अनिल देशमुख नेमके कुठे गायब झाले आहेत? असा प्रश्न ईडीला पडला आहे. आता यासंदर्भात ईडीला सर्वोच्च न्यायालयाकडून आज दिल्या जाणाऱ्या आदेशांची प्रतीक्षा असून अनिल देशमुख नेमके कुठे आहेत, याची आम्हाला माहिती नसल्याचे ईडीचं म्हणणे आहे.
त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नेमकी अनिल देशमुख यांची चौकशी होणार का? आणि झाली, तर ती कधी होणार? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.
दरम्यान, दुसरीकडे अनिल देशमुख प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सीबीआयकडून देखील तक्रार दाखल करण्यात आली असून त्यासंदर्भात राज्य सरकारला नोटीस बजावण्यात आली आहे. न्यायालयात सीबीआयने मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.


