अजून 48 तास चक्रावाताचा तडाखा, निफाड 4.5 अंश सेल्सिअसवर; दवबिंदूही गोठले…!

442

नाशिकः ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा…अशा ओळी आणि नाच हा चित्रपटातच शक्य असतो. कारण नाशिकमधली (Nashik) गुलाबी हवा बघता-बघता कधी गोठली हेच कळेनासे झाले आहे. गेले काही दिवसांपासून सुरू झालेल्या थंडीच्या कडाक्याने शहरवासीयांना अक्षरशः हुडहुडी भरली आहे. दवबिंदूंचा बर्फ होतोय आणि निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात आजही चक्क नीचांकी अशा 4.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. आगामी दोन दिवसांतही मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, (North Maharashtra) मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात थंडीचा लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

गेल्या रविवारपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान घसरले आहे. पुढील दोन दिवस ही लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. किमान तापमान हे दहा अंशाच्या खाली आणि कमाल तापमान 28 अंशांच्या सरासरीपेक्षा 4 ते 6 अंश सेल्सिअसने कमी नोंदवल्यास त्याला थंडीची लाट म्हणतात. 27 जानेवारीपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, तर 28 जानेवारीपासून विदर्भातील थंडीची लाट कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. सध्या उत्तर महाराष्ट्रात अशी थंडीची लाट आल्याचे दिसत आहे. त्यामुळे नाशिककरांनी शेकोट्या पेटवण्यावर भर दिला असून, चहा, गरम दूध प्यायला चाकरमानी गर्दी करत असल्याचे चित्र आहे.

अतिशय झपाट्याने बदलेले हवामान आणि सात दिवसांपासून सुरू असलेल्या गारठ्यामुळे जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष मण्यांची फुगवण थांबली असून, ते तडकण्याचा धोका निर्माण झाला आहे. गहू, हरभरा, भाजीपाला, कांदा, द्राक्ष यांच्यावर या हवामानाचा गंभीर परिणाम होताना दिसून येत आहे. शेतकरी पिकांवर वेगवेगळी औषध फवारत आहेत. त्यामुळे एकीकडे खर्च वाढलाय. तर दुसरीकडे धुक्यामुळे बुरशी, तांबेरा, करपा, भुरी, टिक्का, मावा, तुडतुडे या रोगाची भीती वाढली आहे. सध्या कांद्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. या हवामानामुळे लाखो रुपये खर्चून लावलेले कांदा पीक आणि द्राक्ष धोक्यात आल्याने शेतकऱ्यांच्या काळजाचा पुन्हा एकदा ठोका चुकला आहे. ही थंडी लवकरात लवकर कधी कमी होणार, याकडेच त्याचे डोळे लागलेयत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here