
‘उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी स्वतःच्या मुलाचा पराक्रम पाहावा. त्यानंतर आमच्यावर टीका करावी. पवार हे स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपबरोबर आले असून, तेच महाराष्ट्राचे ‘आका’ आहेत, असा आरोप भाजपचे भौसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केला.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक प्रचाराला सुरुवात झाल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेतील भ्रष्टाचारावरून आणि महापालिका कर्जबाजारी केल्यावरून भाजपच्या स्थानिक नेत्यांवर टीका करत आहेत, या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी ही टीका केली.
आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपबरोबर आलेल्या अजित पवारांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करू नयेत. मला पिंपरी-चिंचवडचा ‘आका’ म्हणत आहेत, मुळात पवार हेच महाराष्ट्राचे ‘आका’ आहेत. पवारांनी स्वतःच्या लेकाचे पराक्रम पाहावे आणि ते स्वतः ‘आका’ आहेत, हे त्यांनी जाहीर करावे. ते नैराश्यातून आरोप करत आहेत. आमच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करायचे असतील, तर मी, महापालिका अधिकारी आणि अजित पवार यांनी समोरासमोर बसावे. मग सर्व उत्तरे मिळतील.
‘महापालिकेतील भ्रष्टाचाराचा ‘आका’ संपवणार आहे. मी कोणाच्या नादी लागणार नाही. विनाकारण माझ्या नादाला कोणी लागले, तर सोडणार नाही. ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी असतात. त्यामुळे कोणाला घाबरायचे नाही, असे उपमुख्यमंत्रौ अजित पवार म्हणाले होते.
भाजपने महापालिका कर्जबाजारी केली. ठेवी मोडल्या आहेत. ४० हजार कोटी रुपयांची कामे कुठे झाली आहेत, याची उत्तरे द्यावीत. त्याला (महेश लांडगे) नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष केले. स्थायी समितीत काय करायचे ते केले आणि आमदार झाला. आता संपत्ती कशी वाढली. दादागिरी किती वाढली आहे, अशी टीका नाव न घेता आमदार महेश लांडगे यांच्यावर केली होती. त्याला आता लांडगे यांनीही उत्तर दिले आहे. त्यामुळे अजित पवार आणि भाजप आमदार महेश लांडगे यांच्यार्त आरोप-प्रत्यारोप वाढले आहेत.
दरम्यान, महेश लांडगेंच्या टीकेवर बोलताना अजित पवार म्हणाले की, मी कोण आहे जनता ठरवेल. 15 तारखेपर्यंत कळ काढा उत्तर देतो असे अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादीकडून एक अलार्म पाच काम् हे कैंपेन सुरू होत आहे. पुण्यातील खड्डे, कचरा गुन्हेगारी, पाणीटंचाई या मुद्द्यांवर रप साँगमधून भाजपच्या कारभारावर टीका करण्यात आली आहे. हे हे गाणं पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या कारभाराबद्दल आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या कारभाराबाबत हे नसल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कचरा, वाहतूक कोंडी, तुटलेले रस्ते, पाणीटंचाई, गुन्हेगारी हे पुण्याचे अलार्म आहेत असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. आपण जे गाणं तयार केलं आहे ते पुणे आणि पिंपरी चिंचवडपुरते मर्यादित आहे. केंद्र आणि राज्य सरकार याचा कुठेही संबंध नाही असे अजित पवार म्हणाले. पालिकेत मोजक्याच लोकांना टेंडर दिले जाते त्याचा फटका नागरिकांना बसतो असेही अजित पवार म्हणाले.





