अजित पवार गटाचा आमदार संग्राम जगतापवर मुस्लिमांविरुद्ध द्वेषपूर्ण वक्तव्यप्रकरणी फौजदारी खटला दाखल

    153

    अकोला, दि. ७ नोव्हेंबर २०२५ : अहिल्यानगर (अहमदनगर)येथील विधानसभेचा सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चा नेता संग्राम अरुण जगताप याच्या विरोधात अकोला मुख्य न्यायिक दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. मुस्लिम समाजाविरोधात धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

    सोलापूर येथे १० ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या ‘हिंदू आक्रोश मोर्चा’च्या सभेत आमदार जगताप यानी दीपावलीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या भाषणात मुस्लिम समाजाच्या भावनांना ठेस पोहोचवणारी आणि दोन धर्मांमध्ये वैर निर्माण करणारी विधाने केली असल्याचा आरोप आहे. या वक्तव्यामुळे सामाजिक आणि सांप्रदायिक तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती, तसेच देशभरातील मुसलमानांच्या भावना दुखावल्याचे नमूद करण्यात आले आहे.

    या संदर्भात अकोल्यातील समाजसेवक, कच्छी मेमन बिरादरीचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते जावेद जकरिया यांनी सुरुवातीला रामदासपेठ पोलीस ठाण्यात, जिल्हा पोलीस प्रशासनाकडे आणि विधानसभा अध्यक्षांकडे लिखित तक्रार दाखल केली होती. मात्र, संबंधित आमदार सत्ताधारी गटातील प्रभावशाली नेता असल्याने पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप जकरिया यांनी केला आहे.

    यानंतर जावेद जकरिया यांनी वरिष्ठ फौजदारी वकील अॅड. नजीब शेख यांच्या माध्यमातून थेट अकोला मुख्य न्यायिक दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला.न्यायालयाने त्यांच्या अर्जाची दखल घेत रजिस्ट्रारमार्फत Cri.M.A./12772/2025 या क्रमांकाने खटला नोंदवला असून, पुढील सुनावणीसाठी योग्य न्यायालयाकडे तो वर्ग करण्यात आला आहे. हा खटला Mohammad VS Sagram या नावाने Cri.M.A./1425/2025 म्हणून नोंदविण्यात आला आहे.

    जकरिया यांनी त्यांच्या याचिकेत आमदार संग्राम जगताप यांना भारतीय न्यायसंहिता (BNS) अंतर्गत कलम १३६ (१) (अ) (ब) (क), कलम १३६ (२), कलम १९७ (अ) (ब) (क) (ड) आणि कलम ३५६ (१) (२) (३) नुसार दोषी धरून दंडित करण्याची मागणी केली आहे.

    या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, अजित पवार गट आणि शरद पवार गटामधील संघर्षाला नवीन वळण मिळाले आहे. या खटल्यात फिर्यादी जावेद जकरिया यांच्यावतीने अॅडव्होकेट नजीब शेख पैरवी करत आहेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here