औरंगाबाद: औरंगाबाद सभेनंतर राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत. औरंगाबाद सभेत मशिंदीच्या भोंग्यांबाबत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा अल्टिमेटम दिला. त्याही आधी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर २ एप्रिल रोजी शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी ‘कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील, जर भोंगा दिसलाच तर त्याच्या समोर दुप्पट आवाजात स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार,’ असा इशारा दिला होता.
त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.औरंगाबाद येथे झालेल्या सभेतल्या भाषणाची सलग पाच तास चौकशी झाली आहे. त्याचा अहवाल डीजीपींकडे देण्यात आला आहे. सभेपूर्वी देण्यात आलेल्या नियमावलींचं उल्लंघन झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
भाषणात तणाव निर्माण होईल अशी वक्तव्ये ही आहेत.आता राज ठाकरेंवर दंगे भडकवण्याच्या हेतूने चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
कलम ११६, ११७, १३५ आणि १५३ अ अंतर्गत औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच औरंगाबाद सभेचे मुख्य आयोजक राजीव जेवळीकर आणि इतर आयोजक यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.
आता पोलिसांकडून राज ठाकरेंना अटक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सरकार आणि मनसेमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.




