अखंडतेच्या लढाईत अमेरिका भारतासोबत; परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांचा चीनला इशारा.
नवी दिल्ली : भारत आणि अमेरिके दरम्यान राजधानी दिल्लीत होणाऱ्या ‘टू प्लस टू’ चर्चासत्रासाठी भारतात आलेल्या अमेरिकी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची मंगळवारी (दि. २७) भेट घेतली. या भेटीनंतर ते म्हणाले, अखंडता राखण्यासाठी सुरु असलेल्या लढाईत आम्ही भारतासोबत आहोत. यावेळी जूनमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत शहीद झालेल्या भारताच्या २० जवानांचा उल्लेख करत पॉम्पियो म्हणाले, अमेरिका कायम भारतासोबत खांद्याला खांदा लावून उभा आहे.
यावेळी माईक पॉम्पियो म्हणाले, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशासाठी वीर मरण पत्करणाऱ्या जवांनाना आदरांजली वाहण्यासाठी राष्ट्रीय शहीद स्मारक या ठिकाणी भेट दिली. येथे चीनी सेनेदरम्यान झालेल्या झडपेमध्ये शहीद झालेल्या २० जवांनाच्या स्मृतींना अभिवादन केले. स्वातंत्र्य आणि अखंडतेसाठी भारताचा संघर्ष सुरु आहे. या संघर्षात अमेरिका नेहमी भारतासोबत उभी राहील.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांनी याआधी सुद्धा गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारला घेऊन चीनवर हल्ला बोल केला होता. ते काहीदिवसांपूर्वी म्हणाले होते, चीन विस्तारवादी धोरणाचा अवलंब करीत आहे आणि त्याच्या विरोधात भारत उभा आहे. जुलैमध्ये माईक पॉम्पियो अमेरिकेतील हाऊस फॉरेन अफेअर्स कमिटीच्या काँग्रेसमध्ये म्हणाले होते की, भारत आणि भूटानमध्ये अतिक्रमण करुन चीनने आपले धोरणे स्पष्ट केले आहे. जर चीन दुसऱ्या देशांवर चालून जातो अथवा अतिक्रमण करतो तेव्हा इतर देश काय भूमिका घेणार हे पाहण्याचा चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा प्रयत्न आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो आणि संरक्षण मंत्री टी एस्पर हे मंगळवार पासून अमेरिका आणि भारत यांच्या दरम्यान होणाऱ्या ‘टू प्लस टू’ या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत. या बैठकीपुर्वी त्यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्याशी भेट घेऊन काही महत्त्वाच्या विषयांवर सल्लामसलत सुद्धा केली.
‘टू प्लस टू’ मालिकेतील ही तिसरी चर्चा आहे. इंडो-पॅसिफिकमध्ये संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढविणे, चीनला शह देण्यासाठी विविध स्वरुपाचे उपाय योजणे यावर चर्चेदरम्यान भर दिला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.





