
अकोले: (Akole) जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात मराठा समाज (Maratha Samaj) हा आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी शुक्रवारी (ता.१) पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगविण्यासाठी हवेत गोळीबार झाला. या घटनेचा राज्यभर निषेध होत असतानाच अकोले (Akole) तील सकल मराठा समाजाने आज अकोले बंदची हाक दिली होती. त्यास व्यापार्यांसह शहरवासियांनी कडकडीत बंद (Strictly closed) ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे या कार्यकर्त्याने काही सहकार्यांसह उपोषण सुरु केलं होतं. २९ ऑगस्टपासून हे उपोषण आंदोलन सुरु होतं. मात्र मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करण्यात आली. मात्र त्यांनी उपोषण मागे घेतलं नाही. शेवटी शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला. लहान मुलं, महिला कुणालाही पाहिलं नाही. प्रचंड लाठीचार्ज केल्यानंतर आम्ही शांत का बसायचं असं मराठा आंदोलकांनी म्हटलं. एवढंच नाही तर पोलिसांनी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे.
या घटनेमुळे राज्य सरकारवर विरोधकांकडून टीकेचा भडीमार होत असून, आरोपांच्या फैरी झडत आहे. तसेच ठिकठिकाणी निषेध होवून एसटी बसेस जाळण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अकोलेतील सकल मराठा समाजाने आज अकोले बंदची हाक दिली होती. त्यास व्यापार्यांसह शहरवासियांनी कडकडीत बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.




