अंकुश चत्तर खून प्रकरणातील; भाजपा नगरसेवक स्वप्नील शिंदेसह पाच जणांना पोलिसांनी केले अटक..!

    263

    राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अंकुश दत्तात्रय चत्तर (वय 35 रा. पद्मानगर, सावेडी) यांच्यावर शनिवारी (दि. 15) रात्री सावेडी उपनगरातील एकविरा चौकात लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोपने खूनी हल्ला केला होता. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात भाजपा नगरसेवक स्वप्निल शिंदेसह पाच जणांना एलसीबी पथकाने ताब्यात घेतले आहे.

    नगरसेवक स्वप्निल रोहिदास शिंदे (रा. वैदवाडी), अक्षय प्रल्हाद हाके (रा. नगर), महेश नारायण कुऱ्हे (रा. सावेडी), विकी ऊर्फ सुरज राजन कांबळे (रा. नगर), अभिजित रमेश बुलाखे (रा. गजराज फॅक्टरी समोर, नगर) अशी ताब्यात घेतलेल्या पाच जणांची नावे आहेत. शिंदे, कुऱ्हे, कांबळे, बुलाखे यांच्या विरोधात पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, याप्रकरणी काल चौघांना ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यात आतापर्यंत नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    शनिवारी रात्री चत्तर यांच्या शेजारी राहणार्‍या एका मुलाचे एकविरा चौकात काही मुलांसोबत भांडण झाले होते. चत्तर यांनी घटनास्थळी जात भांडण करणार्‍या मुलांना समजून सांगून भांडण मिटविले व घटनास्थळावरून काढून दिले होते. त्याचवेळी भांडण करणार्‍यांपैकी राजू फुलारी याने चत्तर यांना उद्देशून, ‘मला तुम्हाला काही बोलायचे आहे,’ असे म्हणून थांबविले व त्यांच्यासोबत बोलत होता. त्याचवेळी तेथे दोन दुचाकी व दोन काळ्या रंगाच्या गाड्या आल्या. त्यातील एका गाडीच्या पाठीमागील काचीवर देवास असे लिहिलेले होते व त्या गाडीमध्ये ड्रायव्हरच्या शेजारील शीटवर नगरसेवक शिंदे बसलेला होता.

    त्या गाड्यातून काही मुले खाली उतरले व गाड्या निघून गेल्या. उतरलेल्या मुलांनी चत्तर यांच्यावर लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोपने हल्ला केला होता. दरम्यान, हल्ला करून पसार झालेल्या स्वप्निल शिंदेसह पाच जणांना ताब्यात घेण्यात एलसीबी पथकाला यश आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी ही कामगिरी केली आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here