१ जानेवारीला पुण्यात एल्गार परिषद होणारच…!

१ जानेवारीला पुण्यात एल्गार परिषद होणारच…!

पुणे – कोरोनाच्या परिस्थितीमुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमू नये म्हणून कार्यक्रमांना मनाई करण्यात आली आहे. मात्र, 1 जानेवारीला पुण्यात एल्गार सांस्कृतिक परिषद होणारच असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला परवानगी मिळावी अशी मागणीही स्वारगेट पोलिसांकडे करण्यात आली आहे.

कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारीला देशभरातील अनुयायी येत असतात. याच निमित्ताने यंदाही पुण्यात एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील गणेश क्रीडा कला केंद्रात ही परिषद घेण्याचा निर्णय पुण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती परिषदेकडून देण्यात आली आहे.

या परिषदेला परवानी देण्यात यावी या मागणीसाठी स्वारगेट पोलीस स्टेशनकडे परवानगीचा अर्ज करण्यात आला आहे, अशी माहितीही देण्यात आली. दोन वर्षांपूर्वी झालेल्या एल्गार परिषदेशी संबंधीत काही विचारवंत आणि दिग्गजांवर कारवाई करण्यात आली होती. तसंच या प्रकरणाचा NIA कडे तपास देण्यात आला आहे.

दरम्यान, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा परिसरात गर्दी न करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे 1 जानेवारी रोजी देखील दूरदर्शन आणि सोशल मीडियावरून दिवसभर प्रसारण सुरू राहणार आहे. मात्र कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ परिसरात कोणत्याही राजकीय सभा अथवा पुस्तकांचे स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here