हिंमत जाधव खून प्रकरणी सात जणांना जन्मठेप
जिल्हा न्यायालयाचा निकाल
१ लाख १९ हजार रुपये दंडाची शिक्षा!
वाळूच्या धंद्यातलं पूर्ववैमनस्य आणि गुन्हेगारी क्षेत्रात वाढता दबदबा आणि गावातले वर्चस्व सहन न झाल्याने सात जणांनी राहुरीतल्या वळण गावच्या हिंमत अभिमन्यू जाधव याची सुपारी देऊन हत्या केली.
दि. १३ सप्टेंबर २०१६ रोजी हे हत्याकांड झालं. तब्बल चार वर्षांनंतर या हत्याकांडच्या खटल्याचा निकाल लागला. जिल्हा न्यायाधिश श्रीमती एन. व्ही. देशपांडे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. न्यायालयाने या हत्याकांडातल्या सातही आरोपींना आजन्म कारावास (जन्मठेप) आणि १ लाख १९ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
कृष्णा अशोक कोरडे (रा. इंद्रानगर, माजलगाव, बीड), सोमनाथ भानुदास मोरे (शिंगणापूर, ता. नेवासा), आजिनाथ रावसाहेब ठोंबरे (रा. जामगांव, ता. गंगापूर,जि. औरंगाबाद), रामचंद्र उर्फ राजू चिमाजी शेटे (रा. वळण, ता. राहुरी, जि. अहमदनगर), संदीप बहिरुनाथ थोपटे (कृषी विद्यापीठ, राहुरी), राहूल बाबासाहेब दारकुंडे (रा. मोरगव्हाण, ता. राहुरी), जावेद कुरेशी (देवगांव, ता. नेवासा, जि. अहमदनगर) अशी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
या खूनप्रकरणात मयत झालेला हिंमत जाधव हा जिल्हा न्यायालयातलं काम संपवून त्याचा मित्र संतोष चव्हाण याच्या दुचाकीवर पाठीमागे बसून घराकडे जात होता. पल्सर या कंपनीच्या दुचाकीवर आलेल्या तिघांनी इमामपूर घाट (ता. नगर) येथे रिव्हाॅल्वरमधून हिंमत जाधववर गोळ्या झाडल्या.
या गोळीबाराची माहिती चव्हाणने त्याचा मित्र लक्ष्मण कुसळकर याने हिंमत जाधवच्या घरी दिली. त्यानुसार त्याचे वडील आणि भाऊ घटनास्थळी आले आणि संतोष चव्हाणने एम. आय. डी. सी. पोलीस ठाण्यात याप्रकरणी अनोळखी तिघांविरुध्द फिर्याद दिली.
त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी भादंवि ३०२ १२० ब अन्वये गुन्हा दाखल केला. सुरुवातीला या गुन्ह्याचा तपास सुरुवातीला सपोनि राहुल पवार यांच्याकडे होता. नंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास गेला. भोईटे यांनी बहुतांश साक्षीदारांचे जबाब घेत आरोपींना अटक, पंचनामे, हत्यार जप्ती आदी महत्वपूर्ण बाबी पूर्ण केल्या.
दरम्यान, या खून प्रकरणातल्या सातही आरोपींना अवघ्या २४ तासांत एलसीबीच्या पोलिसांनी अटक केली होती. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालिन पोलीस निरीक्षक आणि सध्या कोल्हापूर येथे नेमणुकीला असलेले पो. नि. शशिराज पाटोळे आणि त्यावेळी अहमदनगरला नेमणुकीला असलेले परंतू सध्या मुंबई पोलीसच्या बाँबशोधक पथकात कार्यरत असेलेले पोलीस निरीक्षक हिंगोले यांच्यासह कारखिले, बनकर, योगेश गोसावी आदींच्या टीमने ही अवघड आणि जीवावर उदार होऊन मोठ्या शिताफीने कारवाई केली होती. जीवाची पर्वा न करता पोलिसांनी ही कामगिरी केली.
कारण ज्या खोलीत आरोपींना पकडले, त्या खोलीत अंधार होता आणि आरोपींकडे रिव्हाॅल्वर होते.
आरोपींची मस्ती जिरविण्यात यश आल्याचं समाधान
या हत्याकांडातल्या आरोपींना वाळूच्या अमाप पैशाने मस्ती आली होती. या आरोपींमुळे राहुरी तालूका सतत अशांत राहत असे. मात्र या आरोपींच्या मुसक्या आवळल्या राहुरी तालूका शांत झाला. हा खून पूर्वनियोजित होता. खुनाची सुपारी घेणारे आणि देणारे यांचा कुठेही संबंध येणार नाही, या हिशोबाने हे करण्यात आले होते. मात्र आमचा खबर्या शार्प होता. त्याने या आरोपींना फायरिंग करताना पाहिले होते. त्यामुळे आरोपींच्या मुसक्या आवळता आल्या. मात्र वाळूच्या पैशांतून आलेली मस्ती जिरविण्यात आम्हाला यश आलं, याचं समाधान आहे.
शशिराज पाटोळे, पोलीस निरीक्षक कोल्हापूर.
कामगिरीला न्याय मिळाला
अहमदनगर एलसीबीचे तत्कालिन पीआय शशिराज पाटोळे यांच्या पथकाने केलेली ही मोठी आणि अविस्मरणीय कामगिरी म्हणावी लागेल. त्यावेळी कारखिले, बनकर, योगेश गोसावी आदींनी अवघड गुन्ह्यातल्या सराईत आरोपींना अवघ्या २४ तासांत अटक करण्याची खडतर अशी ही कामगिरी त्यावेळी सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरली. त्या खडतर कामगिरीला खर्या अर्थानं न्याय मिळाला.
पोसई हिंगोले, मुंबई बाँबशोधक पथक.