स्वच्छता, चांगले अन्न आणि प्रत्येकांचा सन्मान ही शासकिय रुग्णालयाची त्रीसूत्री ठरावी – पालकमंत्री अशोक चव्हाण

447

स्वच्छता, चांगले अन्न आणि प्रत्येकांचा सन्मान
ही शासकिय रुग्णालयाची त्रीसूत्री ठरावी

  • पालकमंत्री अशोक चव्हाण

• वैद्यकिय महाविद्यालयात 150 खाटांच्या बाल व नवजात शिशू अतिदक्षता विभागाचे लोकार्पण
• मलशुद्धीकरण प्रकल्पाचाही शुभारंभ

नांदेड (जिमाका) दि. 16 :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीपासून प्रत्येक टप्प्याचा मी साक्षीदार राहिलो आहे. आपल्या भागातील गोर-गरीबांना चांगल्या वैद्यकिय सुविधा इथेच उपलब्ध व्हाव्यात ही दूरदृष्टी स्व. शंकरराव चव्हाण यांनी ठेवली होती. त्यातूनच विष्णुपुरी येथील 112 एकर जागेवर हे महाविद्यालय आणि रुग्णालय साकारले. राज्यातील एक आदर्श वैद्यकिय सेवा-सुविधेचे केंद्र म्हणून याकडे पाहिले जाते. कोविड-19 सारख्या महामारीच्या काळात नांदेड जिल्ह्यातील वैद्यकिय सेवा-सुविधांची पायभूत सुविधा उपलब्धता असल्याने आपण हजारो लोकांचे प्राण वाचवू शकलो, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

विष्णुपुरी येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात मलशुद्धीकरण केंद्र (एसटीपी) व बाल अतिदक्षता व नवजात शिशू अतिदक्षता विभाग (कोविड-19) च्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, प्रभारी अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील, प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी कार्तिकेएन, बालविभाग प्रमुख डॉ. सलिम तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.

शासकिय रुग्णालयातील सेवा-सुविधा अतिशय चांगल्या दर्जाच्या व्हाव्यात हा माझा सुरुवातीपासूनचा ध्यास राहिला आहे. या महाविद्यालय व रुग्णालयाशी माझे भावनिक नाते आहे. शासकिय रुग्णालय म्हणजे गोर-गरीबांसाठी मोठा आसरा आहे. याचबरोबर इथे असलेल्या वैद्यकिय सेवा-सुविधा या खाजगी रुग्णालयाच्या तोडीस तोड देणाऱ्या असून यात कुठलीही कमतरता आपण पडू देणार नाही. आज लोकार्पण करण्यात आलेले बाल अतिदक्षता व नवजात शिशू अतिदक्षता विभाग हा कोकीळाबेनमध्ये गेल्यासारखा आनंद झाला या शब्दात त्यांनी कामाचे कौतूक केले. तथापि शासकिय रुग्णालयाच्या यशस्वीतेसाठी स्वच्छता, चांगले अन्न आणि रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान ही त्रीसूत्री कटाक्षाने पाळली पाहिजे याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोविड-19 च्या काळात शासकिय रुग्णालयांची महत्वपूर्ण उपलब्धता नागरिकांच्या आरोग्यासाठी आपल्याला करुन देता आली. यासाठी आपण युद्धपातळीवर नांदेड जिल्ह्यात आरोग्याच्या सेवा-सुविधा भक्कम करण्यावर भर दिला. जिल्हा रुग्णालयात मागील 5 वर्षापासून प्रलंबित असलेल्या बाह्य रुग्ण इमारतीचे काम तातडीने पूर्ण करुन त्याठिकाणी आदर्श असे शंभर खाटाचे सर्व सेवा-सुविधेसह कोविड-19 रुग्णालय सुरु केले. सिव्हील हॉस्पिटलची जुनी इमारत कालबाह्य झाल्याने त्या ठिकाणी आता आपण 300 बेडचे नवीन हॉस्पिटल बांधत आहोत. सुमारे 250 कोटी रुपयांचा निधी यासाठी आपण उपलब्ध करुन देत आहोत. शासकिय वैद्यकिय महाविद्यालया कॉर्डीओलॉजी विभागासाठी 12 कोटी रुपयांचा निधी, कॉन्सर व रेडिओलॉजी विभागासाठी 15 कोटी रुपयांचा निधी आपण उपलब्ध करुन दिला असून हे विभाग लवकरच सुरु करणार आहोत. याचबरोबर नर्सींग कॉलेजला मान्यता घेतली असून त्यासाठी लागणारा मनुष्यबळही मंजूर करुन घेतले आहे. महाविद्यालयाच्या नवीन इमारतीत फर्निचरसाठी 17 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून हे कामही लवकर मार्गी लावल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

आज लोकार्पण करण्यात आलेल्या बालअतिदक्षता व नवजात शिशू अतिदक्षता विभाग (कोविड-19) सुविधेत 150 बेड्सचे तीन वार्ड आहेत. यात ऑक्सिजन सुविधा असलेले 50-50 बेड्सचे दोन वार्ड आहेत. पन्नास बेड्स असलेला एक आयसीयू वार्ड आहे. यात 10 बेड हे नवजात शिशूसाठी आहेत. आयसीयूमध्ये 30 व्हेंटिलेटरर्स, 50 मल्टीपॅरा मॉनिटर्स व सिरींज पंम्पची सुविधा असल्याची माहिती बालरोग विभाग प्रमुख डॉ. सलिम तांबे यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. जमदाडे यांनी केले. यावेळी आमदार मोहन हंबर्डे यांचे समयोचित भाषण झाले.
0000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here