सिरम इन्स्टिट्यूट पाच करोना लसीचे १०० कोटी डोस तयार करणार

नवी दिल्ली : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पाच वेगवेगळ्या करोना लसीचे १०० कोटी डोस तयार करणार आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने याविषयी माहिती दिली आहे. पाच वेगवेगळ्या लसींमध्ये कोविशिल्ड (Covishield), कोवोवॅक्स (Covovax), कोविववॅक्स (COVIVAXX), कोवीवॅक (COVI-VAC), एसआआय कोवॅक्स (SII COVAX) या लसींचा समावेश आहे. २०२२ वर्ष उजाडण्याआधी हे डोस तयार करण्याचा सिरम इन्स्टिट्यूटचा प्रयत्न असून यासाठी त्यांनी तयारीही सुरु केली आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी ही माहिती दिली आहे.

“कोविडशिल्डच्या लसीपासून आम्ही सुरुवात करणार असून २०२१ च्या सुरुवातीपासून प्रत्येक तिमाहीत किमान एक लस लाँच करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे,” अशी माहिती अदर पूनावाला यांनी दिली आहे. युकेमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून विकसित करण्यात आलेल्या कोविडशिल्ड लसीची सध्या तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणी भारतात सुरु आहे. जवळपास १६०० स्वयंसेवक या चाचणीत सहभागी आहेत.

सिरम इन्स्टिट्यूट ब्रिटीश-स्वीडिश कंपनी अॅस्ट्राजेनेकासोबत मिळून करोना लस तयार करत आहे. “आम्ही आधीच २ ते ३ कोटी डोस तयार करत असून ही संख्या महिन्याला सात ते आठ कोटींपर्यंत नेऊ शकतो. सध्या आम्ही मर्यादा पाहता जाणुनबुजून कमी लस तयार करत आहोत,” असे अदर पूनावाला यांनी म्हटले आहे.

सिरम इन्स्टिट्यूटकडून यानंतर कोवोवॅक्स लसीला प्राधान्य दिले जाऊ शकते. बायोटेक कंपनी नोवोवॅक्सच्या साथीने ही लस तयार केली जात आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियात मे २०२० मध्ये कोवोवॅक्स लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली. २०२० च्या अखेरपर्यंत ३० हजार स्वयंसेवकांसोबत तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु होण्याची शक्यता आहे. २०२१ मध्ये सिरमच्या मदतीने १०० कोटी डोस तयार करण्याची नोवोवॅक्सची योजना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here