साई संस्थानचा मोठा निर्णय; 31 डिसेंबरलाही साई मंदिर खुलं राहणार
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरला साई मंदिर सुरु ठेवण्याची मागणी साई भक्तांकडून केली जात होती. त्यानुसार राज्य सरकारच्या नियमांचे पालन करत 31 डिसेंबरच्या रात्रीही मंदिर सुरु ठेवण्याचा निर्णय साई संस्थानने घेतला आहे.
साई संस्थानच्या या निर्णयामुळे नववर्षाच्या सुरुवातीला जास्तीत जास्त भाविकांना साईंचं दर्शन घेता येणार आहे.
दरवर्षी 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता साईंच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित भाविकांनाच दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
मंदिरे सुरु करण्याचा निर्णय घेतल्यापासून आतापर्यंत जवळपास साडे तीन लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला आहे.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.





