सहा लाखाचा गांजा जप्त ; तिघे अटक, संगमनेर पोलिसांची कारवाई
संगमनेर, दि.२१ – घरामध्ये विक्रीसाठी साठवून ठेवलेला ६ लाख १६ हजारांच्या गांजासह ९ लाख ८६ हजार ९४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संगमनेर पोलिसांनी तिघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता,आरोपींना दि.28 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की संगमनेर शहर पोलिस ठाणे हद्दीत शंकर टाऊनशिप कटरिया नगर ता संगमनेर येथे राहणारे जय योगेश्वर गायकवाड यांनी घरांमध्ये विक्रीसाठी गांजा साठवून ठेवला आहे. अशी गोपनीय माहिती पोउनि राणा परदेशी यांना मिळाली होती. याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावून सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणी जययोगेश्वर दगू गायकवाड ( वय 24 रा. रांजणगाव देशमुख स्मशानाजवळ कोपरगाव जि. अहमदनगर ह.मु. शंकर टाऊनशिप साई श्रद्धा चौक संगमनेर), दिपक सुरेश तुपसुंदर (वय 34 रा. खंडेश्वर मंदिर खांडगाव ता. संगमनेर), विशाल निवृत्ती आरणे (वय 26 रा. दिवेकर गॅस एजन्सीजवळ मालदाडरोड, संगमनेर) या तिघांना पकडण्यात आले. यावेळी यांच्या घराची झडती घेतली असता ६ लाख १६ हजार रुपयांचा ७६.४३ किलो ग्रॅम काळपट हिरवट रंगाची पाने, फुले, काड्या व वनस्पतीचे शेंडे असलेला उग्रवास असणारा गांजा पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये मिळून आला. 800 रुपयांचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा, 144 रुपयांची छोट्या पॅकिंगच्या प्लास्टिक पिशव्या आणि 3 लाख 10 हजार रुपयांची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर कार (एम एच 14 बी आर 9487) व 60 हजार रुपये किमतीचे तीन वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल असा 9 लाख 86 हजार 944 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तिघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, दि. 28 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोनि. सुनील पाटील, सपोनि. नरेंद्र साबळे, पोउनि राणा परदेशी, पोहेकाॅ आयुब शेख, पोना अमित महाजन, शिवाजी डमाळे, पोशि सचिन उगले, धनंजय महाले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.