संजय गांधी निराधार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

444

जिल्ह्यातील प्रत्येक निराधार व्यक्तीला आर्थिक साहाय्य मिळण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे

नागपूर दि. ५ : राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य मिळावे, एक प्रकारचे निवृत्तीवेतन मिळावे, यासाठी संजय गांधी निराधार योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.या समितीवरची निवड म्हणजे असहाय्य ,अपंग, अंध, कर्णबधिर, मतिमंद, वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त नागरिकांना थेट आर्थिक मदत करण्याची संधी असते. त्यामुळे आपले सामाजिक दायित्व पूर्ण करत सामान्यातल्या सामान्य माणसाला मदत करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले आहे.
या समितीवर नियुक्त झालेल्या सर्व सदस्यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.राज्य शासनाने संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र व्यक्तीला प्रतिमहा हजार रुपये व अपत्य असल्यास बाराशे रुपये आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे.
ही योजना अपंगातील अस्थिव्यंग,अंध, मूकबधिर, कर्णबधिर, मतिमंद इत्यादी प्रवर्गातील स्त्री-पुरुष, क्षयरोग, पक्षाघात, कर्करोग,कुष्ठरोग, सिकलसेल व सार्वजनिक आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या दुर्धर आजारांसाठी लागू आहे. तसेच दुर्धर आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालू न शकणार्‍या सर्व नागरिकांना, तृतीयपंथीयांना, निराधार, विधवा, घटस्फोटीत, कमी पोटगी मिळणाऱ्या, महिला, परितक्त्या, देवदासी, अत्याचारित महिला, तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील अनाथ मुलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.
पंधरा वर्षापासून महाराष्ट्राचा नागरिक असणाऱ्या व 65 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या सर्वांना यासाठी पात्र ठरविण्यात येते. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21 हजारापर्यंत असणाऱ्या सर्वांना हा लाभ मिळू शकतो. यासाठी केवळ वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, अपंगाचे प्रमाणपत्र, रोगाचा दाखला, अनाथ असल्याचे प्रमाणपत्र, ज्या घटकातून या योजनेचा लाभ मिळवायचा आहे त्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
या समितीवरील नियुक्ती नुकतीच जाहीर करण्यात आली असून पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रासाठी समितीचे अध्यक्ष शेख अय्याज, उत्तर नागपूरसाठी दिपक खोब्रागडे, दक्षिण नागपूरसाठी सुहास नानवटकर, मध्य नागपूरसाठी जुल्फेकार अहमद भुट्टो, पारशिवनीसाठी दिपक शिवरकर, कामठीसाठी प्रमोद खोब्रागडे, रामटेकसाठी विवेक तुरक, भिवापूरसाठी बाळू इंगोले, कुही तालुक्यासाठी सुनिल कर्दीले, उमरेडसाठी जितेंद्र गिरडकर, मौदासाठी राजेंद्र लांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here