शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा! आ. भातखळकर यांची मागणी
मुंबई : मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, माधुरी भोईर, संजना घाडी आणि सुजाता पाटेकर या शिवसेना नगरसेवकांनी नागरिकांना डॉक्टरांचा सल्ला न घेता ‘कंपाउंडर’कडून औषधे घेण्याकरिता प्रोत्साहित करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांची जाहिरात केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपाचे आ. अतुल भातखळकर यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेची जनजागृती करताना शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी दाखविलेली बेजबाबदारी चर्चेचा विषय ठरत आहे. लक्षणानुसार कोरोनाची औषधे कधी आणि कशी घ्यावीत, याची जाहिरातबाजी पक्षाच्या काही नगरसेवकांनी समाजमाध्यमांवर केली.
ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याविना घेणे धोकायदायक असून त्याची अशा रीतीने जाहिरात करणे चुकीचे असल्याचे नोंदवित ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) आक्षेप घेतला आहे. यावरून भाजपा आ. भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
शिवसेनेच्या नगरसेवकांनी नागरिकांना ‘कंपांउडर’कडूनच औषधं घेण्यास प्रोत्साहित करू नये, असं म्हणत त्यांनी टोला लगावला. दरम्यान, संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल न झाल्यास न्यायालयात जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.