वीजबिलात मोठा झटका ! ५०० युनिट वापरल्यास आता मोजावे लागतील ‘इतके’ रुपये

    158

    Maharashtra Electricity Rates : महागाईनेत्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आता वीजबिलाचा आणखी एक मोठा झटका बसणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने जुलै २०२५ पासून लागू होणाऱ्या नव्या दरनिश्चितीमुळे पुण्यासह संपूर्ण राज्यातील लाखो घरगुती ग्राहकांच्या वीजबिलात मोठा फरक जाणवणार आहे.

    शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना यंदा दरमहा साधारण १२.७६ रुपयांची सूट मिळणार असली, तरी त्यापुढील युनिट वापरणाऱ्यांसाठी वीजबिल झपाट्याने वाढणार आहे. तीनशे युनिट वापरणाऱ्यांचे बिल महिन्याला सुमारे २४५ रुपयांनी, तर पाचशे युनिट वापरणाऱ्यांचे बिल तब्बल ५०६ रुपयांनी वाढणार आहे.

    हे दर १ जुलै २०२५ पासून लागू झाले असून, पुढील चार वर्षांसाठी आयोगाने हे दर निश्चित केले आहेत. महावितरणच्या पाच वर्षांसाठी सादर केलेल्या प्रस्तावास आयोगाने मंजुरी दिली असून, यामुळे काहींच्या खिशाला थोडा आराम मिळणार असला, तरी बहुतांश ग्राहकांना आर्थिक फटका बसणार आहे.

    विशेष म्हणजे, शंभर युनिटपर्यंत वापर असलेल्या ग्राहकांना दिलासा दिला गेला आहे. मात्र १०१ युनिटपासून पुढे जाणा-यांसाठी दरवाढ सणासुदीच्या हंगामातही बजेट बिघडवणारी ठरणार आहे. वीजतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, दोनशे युनिट वापर करणाऱ्यांचे वार्षिक बिल तब्बल ३,००० रुपयांनी वाढू शकते, तर पाचशे युनिट वापरणाऱ्यांचे बिल वर्षभरात ६,००० रुपयांनी वाढण्याचा अंदाज आहे.

    या दरवाढीमागे इंधन समायोजन आकार, स्थिर आकार, वीजवाहन शुल्क, वीज कर अशा विविध बाबी आहेत. त्यामुळे अंतिम ग्राहकाच्या बिलावर त्याचा थेट परिणाम होतो. उदा. ५०० युनिट वापरणाऱ्या ग्राहकांचे बिल मागील वर्षी ७,१३६ रुपये येत होते, ते यंदा ७,६४३ रुपयांवर जाऊन थांबणार आहे.

    पुणेकरांचं मत काय ?

    पुण्यातील निवृत्त शिक्षक शंकर राणे म्हणाले, “दर महिन्याला काही न काही वाढतंय. आता वीजबिलातही मोठी वाढ झाली आहे. शंभर युनिटच्या वरचा वापर करणाऱ्या सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना याचा फटका बसेल.”तज्ज्ञ सांगतात की, जर ग्राहकांनी वीज वापराची सवय थोडी बदलली आणि उपकरणांचा वापर जाणीवपूर्वक केला, तर बिलावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येईल. मात्र वाढती दरपद्धत पाहता, ही सवय लवकर लागणे गरजेचे आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here