विमाधारक पूरग्रस्तांना दोन आठवड्यात भरपाई द्या जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे निर्देश

712
  • कोल्हापूर दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय) :- पुरामुळे बाधित झालेले व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक यांचे विम्याचे क्लेम विमा कंपन्यांनी तातडीने पूर्ण करावेत. विमा क्लेमसाठी कोणाचीही अडवणूक करु नये. सामाजिक बांधिलकी समजून विम्याचे क्लेम दोन आठवड्यात विमाधारकास द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी आज दिले.
  • पूर बाधित भागातील विमाधारकांना विम्याचे क्लेम तातडीने मिळावेत यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली विमा कंपनींचे अधिकारी, प्रतिनिधी आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रतिनिधी यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. बैठकीस आमदार चंद्रकांत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, चेंबर ऑफ कॉमर्सचे ललीत गांधी, संजय शेटे, शिवाजीराव पोवार, संजय पाटील, धनंजय दुग्गे, हरिभाई पटेल, अजित कोठारी आदी उपस्थित होते.
  • जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, महापुरामुळे ज्या व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे, त्यांना विम्याची रक्कम तात्काळ मिळणे आवश्यक आहे. यासाठी विमा कंपन्यांनी बाधित भागातील सर्व्हे तातडीने पूर्ण करावेत. बाधित भागाची विमा एजंटद्वारे माहिती संकलित करा. सर्व्हे तातडीने पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातील सर्व्हेअरची मदत घ्या. सर्वेअरकडून तातडीने सर्व्हे करून घेणे विमा कंपनीची जबाबदारी आहे, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी म्हणाले, व्यावसायिक, दुकानदाराने काढलेले फोटो, व्हिडिओ विमा क्लेमसाठी ग्राह्य धरावेत.
  • जिल्हाधिकारी म्हणाले, विमा रक्कमेबाबत काही तक्रार असल्यास,जी रक्कम कंपनीने ठरवली आहे, ती रक्कम तात्काळ विमाधारकांच्या खात्यावर जमा करा व ज्या रक्कमेबद्दल तक्रार आहे त्यावर चर्चेतून मार्ग काढा. शनिवार, रविवार सुट्टी न घेता, येत्या दोन आठवडयात विमाधारक पूरग्रस्तांना नुकसानाची भरपाई द्यावी. विमा घेण्यासाठी, हफ्ता भरण्यासाठी संदेश, कॉल करता तसेच नुकसान भरपाई घेण्यासाठी तात्काळ संपर्क साधावा असा संदेश विमाधारकास पाठवून सूचना द्याव्यात. सर्व्हेअरची कडून तात्काळ रिपोर्ट घ्यावेत. जे सर्व्हेअर रिपोर्ट द्यायला विलंब करतील, त्यांचे परवाने रद्द करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
  • विमा कंपन्यांनी नियमावर बोट ठेऊन, विमाधारक पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करु नये. पुरामध्ये शेतकऱ्यांपासून व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांचेच नुकसान झाले असल्याने त्यांचे विमा क्लेम तातडीने पूर्ण करावेत. विमाधारक व विमा कंपनी यांच्यात विमा क्लेमबाबत काही समस्या उद्भवल्यास त्या सोडविण्यासाठी व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधीनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन चंद्रकांत जाधव यांनी केले.
  • 00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here