औरंगाबाद, दि. 23 (जिमाका) – जिल्ह्यात कोविड -19 विषाणूचा संसर्ग होणार नाही यासंबंधिच्या शासनाच्या सर्व उपाय योजनांचे पालन करत लोकशाही दिन जिल्हा व तालुका पातळीवर आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. नागरिकांनी त्यांच्या तक्रारी, अडचणीच्या अनुषंगाने विहित नमुन्यातील अर्ज सादर करून लोकशाही दिनात सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी नागरिकांना केले.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सर्व महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत लोकशाही दिन आयोजन करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. जिल्ह्यात कोविड -19 विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा, तालुका पातळीवरील लोकशाही दिनाचे आयोजन तात्पुरते स्थगीत करण्यात आले होते. परंतु सर्व सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची सोडवणूक होण्यासाठी नियमितपणे लोकशाही दिन आयोजित करण्याच्या सूचना श्री. चव्हाण यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात मागील तीन महिन्यापासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे तालुका पातळीवर तहसिल कार्यालयात सूद्धा प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी नियमितपणे लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे, असेही श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.