लडाखमधून ताब्यात घेतलेल्या PLA च्या ‘त्या’ सैनिकाला पुन्हा चीनकडे सोपवलं

भारताच्या ताब्यात असलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकाला पुन्हा चीनकडे सोपवण्यात आलं आहे. दोन दिवसांपूर्वी पूर्व लडाखच्या डेमचॉक भागातून या सैनिकाला ताब्यात घेण्यात आले होते. या सैनिकाकडे नागरी आणि लष्करी कागदपत्रे सापडली होती. मंगळवारी रात्री या सैनिकाला चीनकडे सोपवण्यात आले.

वँग या लाँग असे या सैनिकाचे नाव आहे. चुशूल मोल्डो येथे या सैनिकाला चीनकडे सुपूर्द करण्यात आले. हा चिनी सैनिक झीजियांग प्रांताचा रहिवाशी आहे. शस्त्रास्त्रे दुरुस्त करण्याचे काम तो करतो. प्रस्थापित शिष्टाचारानुसार, सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चुशूल-मोल्डो येथे या सैनिकाला पुन्हा चीनकडे सोपवले जाईल, असे सैन्याकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार या सैनिकाला चीनकडे सोपवण्यात आले आहे.

उंचावरील प्रतिकुल वातावरणामुळे या सैनिकाला ताब्यात घेतल्यानंतर वैद्यकीय सहाय्य करण्यात आले. त्याला ऑक्सिजन, अन्न आणि उबदार कपडे देण्यात आले. बेपत्ता असलेल्या सैनिकाबाबत पीएलएकडूनही विनंती करण्यात आली होती. पीएलचा हा सैनिक हेरगिरीच्या मोहिमेवर होता का? त्याचा सुद्धा तपास करण्यात आला. पूर्व लडाख सीमेवर सध्या प्रचंड तणावाची स्थिती आहे. नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनने ५० हजार सैनिक तैनात केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here