रेखा जरे खून प्रकरणाला कोर्टाबाहेर लागले वेगळे वळण

1385

रेखा जरे खून प्रकरणाला कोर्टाबाहेर लागले वेगळे वळण

रेखा जरे खून प्रकरणात नवी घडामोड जरे आणि बोठे कुटुंबातील व्यक्तींकडून परस्परांविरूद्ध धमकावल्याच्या तक्रारी पारनेर पोलिस ठाण्यात २७ जुलै रोजी ही घटना घडल्याचा दावा अहमदनगर : रेखा जरे खून प्रकरणाला कोर्टाबाहेर वेगळं वळण लागलं आहे. जरे यांचा मुलगा रुणाल व मुख्य आरोपी बाळ बोठे याच्या पत्नी अ‍ॅड. सविता बोठे यांनी परस्परांविरूद्ध धमकावल्याच्या तक्रारी केल्या आहेत. पारनेर पोलिस ठाण्यात २७ जुलै रोजी ही घटना घडल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

अ‍ॅड. बोठे यांनी जरे, त्यांचा अंगरक्षक, वकील आणि पारनेरच्या पोलिस अधिकाऱ्याविरूद्धही तक्रार केली आहे. दोघांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रारी केल्या आहेत. रुणाल जरे यांनी म्हटलं आहे की, २७ जुलैला आपण कामानिमित्त पारनेर पोलिस ठाण्यात गेलो असता तेथे बोठे याच्या पत्नीने अंगरक्षकाला आणि आपल्याला धमकावले. त्यामुळे आपल्या जीवाला धोका आहे.

त्यानंतर बोठेच्या पत्नी अ‍ॅड. सविता यांनीही पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘मी, मुलगा यश आणि दीर अनुपम यांच्यासह पारनेर पोलिस ठाण्यात गेले होते. तुरुंग अधिकाऱ्यांची रितसर परवानगी घेऊन पतीची भेट घेतली. त्यावेळी तेथे जरे आणि अंगरक्षक पोलिस अमोल शिरसाठ होते. तेथे कोठेडीत असलेल्या माझ्या पतीने शिरसाठ यांनी बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचे सांगितले. याची तक्रार करण्यासाठी मी पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्याकडे गेले. त्यांनीही पोलिसांची बाजू घेत आपल्याला कक्षाबाहेर जाण्यास सांगितले. त्यावेळी रुणाल व अंगरक्षक शिरसाठ यांनीही मला धमकावले. ‘बोठेविरूद्ध खोटे गुन्हे दाखल केले आहेत, तुमच्याविरूद्धही करू. त्याला बाहेर येऊ देणार नाही, तुम्हा दोघांनाही बघून घेऊ, अशी धमकी दिली,’ अशी तक्रार बोठे यांनी केली आहे.

अ‍ॅड. सविता बोठे यांनी पुढे म्हटलं आहे, ‘रुणाल जरे यांचे पारनेर पोलिस ठाण्यात काम नसताना तिकडे चकरा का होतात? आम्हाला कोर्टाच्या कामासाठी सतत बाहेर पडावे लागते. या पार्श्वभूमीवर मला आणि मुलाला जरे तसेच त्यांचे अंगरक्षक, वकील पटेकर यांच्यापासून धोका आहे. गेल्या सात-आठ महिन्यांपासून पोलिसांची सवय झाली आहे. त्यामुळे पारनेर पोलिस ठाण्यात घडलेल्या या प्रकाराची तक्रार करणार नव्हतो. मात्र, उलट जरे यांनीच आपल्याविरूद्ध खोटी तक्रार केल्याचे समजल्यावर मी वस्तुस्थिती सांगण्याची ही तक्रार करीत आहे,’ असं अ‍ॅड. बोठे यांनी म्हटलं आहे. तसंच या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, बोठे याने जामीन मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर गुरूवारी सुनावणी होणार होती. मात्र, सरकारपक्षाने म्हणणे सादर करण्यासाठी मुदत वाढवून घेतल्याने आता ती ४ ऑगस्टला होणार आहे. आरोपी बाळ बोठे सध्या पारनेरला न्यायालयीन कोठडीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here