सांगली, दि. 09, (जि. मा. का.) : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील 40 बालके ह्रदय शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथील एस.आर.सी.सी रुग्णालयाकडे रवाना होत असून या सर्व बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया होईल असा मला विश्वास आहे. बालकांच्या पालकांनी निर्धास्त रहावे, आपल्या बालकांवर योग्य पध्दतीने शस्त्रक्रिया होईल, या संकटातून आपण निश्चित बाहेर याल असा मला विश्वास आहे. बालकांच्या शस्त्रक्रियेसाठी माझ्या मनपुर्वक: शुभेच्छा असे भावपुर्ण उद्गार जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी काढले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मोफत शस्त्रक्रिया बालक-पालक शुभेच्छा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी दूरदुष्यप्रणालीद्वारे पालकमंत्री जयंत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, बालरोग तज्ञ डॉ. मिरगुंडे, डॉ. कल्याणी शिंदगी, वैद्यकीय अधिकारी डॉ. नवाजशरिफ मुजावर, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, शस्त्रक्रिया होणारी बालक व त्यांचे पालक उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये सन 2013-14 पासून आज अखेर 1 हजार 32 ह्रदयरोग शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तर इतर प्रकारच्या 10 हजार 450 शस्त्रक्रिया करण्यात आले आहेत. माहे जुलै 2021 मधील इको तपासणी मधून ह्रदय शस्त्रक्रियेसाठी 40 बालक पात्र झाले आहेत. या 40 बालकांना आज मुंबईकडे शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात येत असून यासाठी प्रति शस्त्रक्रिया 8 लाख 50 हजार खर्च आहे. मुंबईकडे पाठविण्यात येणाऱ्या सर्व बालकांसाठी अंदाजित 2 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. यासाठी मुंबई येथील क्विन्स नेकलेस चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ मुंबई, इतर धर्मादाय संस्था, दानशुर व्यक्ती यांच्याकडून काही निधी प्राप्त झाला आहे. उर्वरित सर्व निधी अनुदान स्वरुपात शासनाकडून देण्यात येऊन या शस्त्रक्रिया पुर्ण करण्यात येणार आहेत. असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले सांगली जिल्हा हा देशातील सर्वाधिक कॉक्लिअर इम्प्लांट या शस्त्रक्रिया पुर्ण झालेला जिल्हा आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांमध्ये राज्यात सांगली जिल्हा गेली 5-6 वर्षापासून अग्रक्रमावर असल्याचा मला अभिमान आहे.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यावेळी म्हणाले, कोविड सारख्या महामारीच्या कालावधीत आरोग्य यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहे. अशा व्यस्त कामाच्या परिस्थितीत सुध्दा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने इतर आजरांवरही औषधोपचार व शस्त्रक्रिया चालु ठेवल्या आहेत. हे आरोग्य यंत्रणेचे काम वाखानण्यासारखे आहे. आरोग्य विभागाच्या या कामाचे फलित म्हणून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 40 बालके ह्रदय शस्त्रक्रियेसाठी मुंबईकडे रवाना होत आहेत. या सर्व बालकांवर योग्य व यशस्वी शस्त्रक्रिया होऊन ही सर्व बालके आनंदाने परत येतील. या बालकांच्या शस्त्रक्रियेसाठी ईश्वर चरणी प्रार्थना करुन मी त्यांना शुभेच्छा देतो.
यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनीही ह्रदय शस्त्रक्रियेसाठी बालक व पालकांना शुभेच्छा देऊन आम्ही आपल्या पाठीशी सदैव उभे राहू असा विश्वास दिला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये बालकांच्या तपासणीसाठी 32 पथके तयार करण्यात आली असून ही सर्व पथके बालके तपासणीचे काम करत आहेत. या तपासणीतून जी बालके आजारी सापडतील त्यांच्या वेगवेगळ्या चाचण्या केल्या जातात. त्याचबरोबर ह्दयाच्या चाचण्यां नंतर 40 बालकांवर ह्दय शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आले असून आत ही सर्व बालके ह्दयशस्त्रक्रियेसाठी मुंबईकडे रवाना होत आहेत. या सर्व बालकांची शस्त्रक्रियेसह प्रवास, भोजन, निवास, पुर्वतपासणी करण्याची मोफत सोय करण्यात आली आहे.
बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत क्वॉकलिअर इन्प्लांट शस्त्रक्रिया झालेल्या कु. ऋतुजा जोशी व अनुष्का पतकुरे या दोन बालिकांनी झालेल्या उपचाराबाबत आपले मनोगत व्यक्त करुन जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व शासनाचे आभार मानले. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी बालकांना शस्त्रक्रियेसाठी घेऊन जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या दोन बसना हिरवा झेंडा दाखवून मुंबईकडे रवाना करण्यात आले.
000000