यंदा नवरात्र उत्सवात रास-दांडिया नाहीच; तरुण-तरुणींच्या आनंदावर फेरले पाणी
पुणे : यंदा गणेशोत्सव अगदीच साध्या पद्धतीने साजरा झाला… आता नवरात्रौ उत्सव, रास दांडियाचे काय?… तर हा देखील उत्सव साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. तसेच रास-दांडिया देखील या वर्षी खेळला जाणार नाही.
येत्या 17 ऑक्टोबरपासून नवरात्री उत्सव सुरू होणार आहे. महाराष्ट्रातही या उत्सवाला महत्त्व आहे. या काळात अनेक ठिकाणी देवीच्या मंदिरात गर्दी होते. तसेच रास-दांडिया खेळण्याची प्रथा आहे. शहरांमध्ये मोठ्या मैदानात रास-दांडियाचे कार्यक्रम, आयोजित केले जातात, त्यात हजारो तरुण-तरुणी, नागरिक सहभागी होतात. यात पुणे देखील मागे नाही. महावीर जैन विद्यालय असो की म्हात्रे पुलानजीक असलेल्या लॉन्स असो, अनेक ठिकाणी नवरात्रीत रास-गरबा दांडिया खेळला जातो. गुजराती, मारवाडी समाजासह महाराष्ट्रीय समाजही यात मोठ्या संख्येने असतो.
पुण्यात कोरोनाचा कहर पाहता यावर्षी नवरात्रीचे धार्मिक कार्यक्रम घरगुती पद्धतीने होतील. सार्वजनिक कार्यक्रमांवर मात्र मर्यादा येणार आहे. राज्य सरकार किंवा महापालिका आणि जिल्हा प्रशासन या कार्यक्रमांना परवानगी देणार नाही, अशी उत्सव आयोजकांचे म्हणणे आहे. तसेच यावर्षी दांडिया वगळता नवरात्री उत्सव साधेपणाने साजरा करण्याची तयारी देखील त्यांनी केली आहे.