मुंबई, ठाण्यासह २५ जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध येत्या दोन दिवसांत शिथिल होणार!
मुंबई : मुंबई, ठाण्यासह २५ जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या जिल्ह्यांत दुकाने रात्री ८ पर्यंत खुली ठेवण्यास मुभा दिली जाणार असून, उपाहारगृहे आणि मॉल ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. मात्र, रुग्णसंख्या जास्त असलेल्या पुण्यासह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहेत.
राज्यातील रुग्णवाढीचा दर ०.११ टक्के
राज्याचा रुग्णवाढीचा दर ०.११ टक्के असून, साप्ताहिक बाधितांचे प्रमाण ३.८ टक्के आहे. या दोन निकषांच्या आधारे राज्य सरासरीपेक्षा कमी रुग्णवाढ तसेच बाधितांचे प्रमाण असलेल्या २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच याबाबतचा आदेश निर्गमित करण्यात येईल, असे टोपे यांनी सांगितले.
निर्बंध शिथिल होणारे जिल्हे
मराठवाडा : परभणी, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद आणि उस्मानाबाद.
विदर्भ : अमरावती, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, बुलढाणा, भंडारा. यवतमाळ, वर्धा, वाशीम आणि हिंगोली.
कोकण: रायगड, ठाणे आणि मुंबई
उत्तर महाराष्ट्र : जळगांव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक
या जिल्ह्यांत निर्बंध कायम
पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, अहमदनगर आणि बीड अशा ११ जिल्ह्यांत सध्याचे निर्बंध कायम राहणार आहे.
रेल्वे प्रवासाबाबत सावध भूमिका
सर्वांना उपनगरी रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी देण्याची मागणी सर्वच क्षेत्रांतून जोर धरत आहे. लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना तरी उपनगरी रेल्वेतून प्रवास करण्यास परवानगी द्यावी, असा आग्रह असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही गुरुवारी ही मागणी केली. याबाबत आरोग्य तसेच मदत व पुनर्वसन विभागाने तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे. मात्र, लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांची खातरजमा कशी करणार, तेवढी यंत्रणा रेल्वेकडे आहे का याबाबत मुख्यमंत्री रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असून, त्यानंतरच याबाबतचा निर्णय होणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.





