अलिबाग,जि.रायगड, दि.11 (जिमाका):- जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील तालुका मास्टर ट्रेनर, तलाठी, कृषी सहायक यांची प्रशिक्षण कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन येथे नुकतीच पार पडली.
या कार्यशाळेस जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीसह निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले, जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, तलाठी, कृषी सहायक उपस्थित होते.
श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे, तळा तहसिलदार अण्णाप्पा कनशेट्टी, उरण तलाठी शशिकांत सानप यांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले.
या प्रशिक्षण कार्यशाळेच्या निमित्ताने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी यावेळी ई-पीक पाहणी आजच्या काळाची गरज असून शेतकऱ्यांना आपले स्वतः घेतलेले पीक ऑनलाइन नोंदविण्याची सुविधा दिल्यामुळे अचूक पीक पेरा नोंदविण्यात येईल, असे मत नोंदविले.
राज्यात दि.15 ऑगस्ट 2021 पासून राज्यातील सर्व शेतकरी हे त्यांनी पेरलेले/लावलेले शेतातील पीक हे तलाठी यांना ऑनलाईन ई पीक ॲप च्या माध्यमातून पाठवतील,शेतातील घेतलेल्या अचूक पिकांची नोंद ऑनलाईन झाल्याने पीक विमा, नैसर्गिक आपत्ती, कृषी विभागाकडील योजना यासाठी यांचा वापर होईल तसेच शेतातील जलसिंचन साधने यांच्या नोंदी अदययावत झाल्याने पाण्याखालील क्षेत्राचा अंदाज येईल.
शेतकऱ्याने स्वत: घेतलेली पीके ई पीक ॲप माध्यमातून अपलोड केल्यानंतर पेरणी क्षेत्र समजून येईल. हा प्रकल्प शेतकरी बांधवासाठी नक्की लाभदायक ठरेल यात शंका नाही. याबाबत ग्रामस्तरावर देखील शेतकरी बांधवाच्या कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.
000000