महिनाभरानंतर पावसाचा परतीचा प्रवास देशातून पूर्ण

नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास महिनाभरानंतर देशातून पूर्ण झाला आहे. पाठोपाठ ईशान्य मोसमी वाऱ्यांचे आगमन झाले आहे. गेल्या वर्षीदेखील ऑक्टोबरच्या मध्यावर अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. यावर्षी परतीचा प्रवास लांबला तसेच ईशान्य मोसमी वाऱ्यांचे आगमन देखील लांबले आहे.

२८ सप्टेंबर रोजी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरूवात झाली होती. नेहमी १५ दिवसांत हा प्रवास पूर्ण होत असतो. मात्र बंगलाचा उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले व हे क्षेत्र अरबी समुद्रकडे सरकले. परिणामी पावसाचा परतीचा प्रवास खंडीत झाला होता. त्या काळात महाराष्ट्र आंध्रप्रदेश व कर्नाटकात मुसळधार पावसाने झोडपलं होतं. त्यानंतर खंडीत झालेला पावसाचा परतीचा प्रवास चार दिवसांपूर्वी पुन्हा सुरू होऊन आज तो पूर्ण झाला आहे.

नैऋत्य मोसमी पाऊस थांबला की देशातील आर्द्रतेचे प्रमाण कमी होऊ लागते. हा कालावधी शक्यतो १५ दिवसांचा असतो. तो अवधी मिळाला नाही की तापमानात वाढ होऊन इतरत्र पाऊस पडण्याची शक्यता असते. गेल्यावर्षी असा पाऊस मध्य भारत आणि महाराष्ट्रात झाला होता.
२८ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण भारतीय द्वीपकल्पात पाऊस संपलेला असेल. सध्या देशातील अनेक भागात मुसळधार पावसामुळं पूरस्थिती दिसत असली तरी चार दिवसांनंतर संपूर्ण देशभरात कोरडी स्थिती असेल, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने २४ ऑक्टोबर रोजी आपल्या बुलेटिनमध्ये दिली होती.
बंगालचा उपसागर आणि दक्षिण द्वीपकल्पातील जमीनीवरुन ईशान्येकडून वारे वाहू लागल्याने नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून २८ ऑक्टोबरच्या सुमारास संपूर्ण देशातून मागे हटण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले होते. मान्सूनच्या परतीची तारखी साधारणत: १५ ऑक्टोबर असते. मात्र, यंदा मान्सूनला माघार घ्यायला जवळपास पंधरवाड्याचा उशीर झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here