
कर्जतः ‘महावितरण’च्या कामामध्ये कमिशन न दिल्यामुळे ठेकेदाराला जबर मारहाण केल्याप्रकरणी शंकरराव उर्फ शहाजी भाऊसाहेब राजे भोसले (वय 45) यास अटक करण्यात आली आहे.
याबाबत ठेकेदार वसीम शेख यांनी कर्जत पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तालुक्यातील राशीन येथील राजे वस्ती परिसरात रॅम्सन सोलर पल्स या कंपनीचे प्रोजेक्टचे काम सुरू आहे. या साइटवर वसीम नौशाद शेख हे ठेकेदार (रा. भिगवन) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती योजनेंतर्गत काम करत असताना त्या ठिकाणी भाजप नेते शहाजीराजे भोसले, युवराज राजे भोसले, गुटाळ व आणखी सात ते आठ अनोळखी युवक आले.
त्यांनी या कामासाठी 12 टक्के कमिशन मागणी करून देत नाही, म्हणून काम बंद पाडले. त्या ठिकाणी असलेल्या साहित्याची जेसीबी मशीन आणून नासधूस केली. त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केली. दोन कॅमेरे घेऊन गेले व दोन पोल पाडून त्याचे नुकसान करून सुरक्षारक्षकाला धमकावले.
यानंतर वसीम शेख हे कंपनीचे अधिकारी सुनील तिवारी व रमेश कुमार सहा आणि पोलीस या सर्वांना घेऊन त्या ठिकाणी झालेल्या नुकसानाची माहिती देत असताना त्या ठिकाणी पुन्हा युवराज राजे भोसले यांनी सात ते आठ लोक जमवून सुनील तिवारी व रमेश कुमार सहा यांना लाकडी काठ्या, लोखंडी रॉड, लौखंडी चैन, फायबर टिकावाचा दांडा याने जबर मारहाण केली व फिर्यादी वसीम शेख व सुनील कुमार चा मोबाईल फोन, तसेच चार चाकी गाडीची चावी व रोख पंचवीस हजार रुपये काढून घेतले, अशी तक्रार वसीम शेख यांनी कर्जत पोलीस स्टेशन येथे दिली.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, शंकरराव ऊर्फे शहाजी भाऊसाहेब राजे भोसले (वय 45) यास अटक करण्यात आली आहे.