महाराष्ट्रातील रंगकर्मीसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येणार ■ सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

938

महाराष्ट्रातील रंगकर्मीसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येणार
■ सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

मुंबई, दि.१० ऑगस्ट २१ :
राज्यातील माथाडी कामगारांसाठी वेगवेगळी माथाडी मंडळे आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्रातील रंगकर्मीसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेईल अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.


राज्यातील विविध कला क्षेत्रातील रंगकर्मीशी आज सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी मंत्रालयात संवाद साधला. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे, रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्रमार्फत अभिनेते विजय पाटकर, अभिनेत्री मेधा घाडगे, विजय राणे, संचित यादव, शीतल माने, अमिता कदम, सुभाष देशमुख, उमेश ठाकूर, चंद्रशेखर सांडवे आदी उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रात वेगवेगळया कलाक्षेत्रात अनेक कलाकार काम करीत आहे. या सर्व रंगकर्मीसाठी हे कल्याणकारी मंडळ काम करणार असून हे मंडळ लवकर स्थापन होण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग प्रयत्नशील आहे. राज्यातील कलाकारांची नोंदणी करण्याचे काम जिल्हास्तरावर करण्यात येत असले तरी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने ऑनलाईन कलाकार नोंदणी कशी सुरु करता येईल याबाबत प्रयत्न करावेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून राज्य शासनामार्फत सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी ही कलाकार आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी असून अजूनही कोविडचा धोका टळलेला नाही. वेगवेगळया क्षेत्रासाठी राज्यभरातील निर्बंध कमी करण्यात येत असले तरी संभाव्य कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. त्यामुळे खबरदारी घेणे तितकेच आवश्यक असल्याचेही श्री. देशमुख यांनी सांगितले. म्हाडा आणि सिडकोच्या घरांमध्ये रंगकर्मीसाठी राखीव ठेवलेल्या सदनिकांमध्ये मुंबईमध्ये 5 टक्के आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये 2 टक्के प्रमाण असावे अशी मागणी आपण यापूर्वीच राज्य शासनाकडे केली असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.

रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र या संस्थेतर्फे काही कायमस्वरुपी मागण्या करीत असलेले पत्रक सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख यांना देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील रंगकर्मीची नोंद होणे, कलाकार पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी अटींमध्ये शिथिलता आणणे, असंघटित रंगकर्मीसाठी रंगकर्मी बोर्ड स्थापन करणे, वयोवृध्द रंगकर्मीसाठी शासकीय आणि खाजगी वृध्दाश्रमात प्राधान्याने व्यवस्था करावी, एकपात्री किंवा दोनपात्री कलाकारांना कला सादर करण्याची परवानगी, अटी व नियमांचे पालन करुन रंगकर्मींना कला सादर करण्याची परवानगी अशा काही मागण्या यावेळी रंगकर्मीनी श्री. देशमुख यांना केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here