मग आता आम्ही गांजा पिकवायचा का? महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकर्यांचा केंद्राला सवाल!
अहमदनगर :
यंदाच्या प्रचंड पावसामुळे लाखो रुपये खर्चून पिकविलेला सत्तर ते ऐंशी टक्के कांदा सडला. उर्वरित कांद्याला चांगला भाव मिळेल, सावकाराचं कर्ज फेडता येईल आणि कुटुंबाची गाडी रुळावर येईल, अशी स्वप्नं पाहत असलेल्या कांदा उत्पादकांच्या या स्वप्नांचा केंद्र सरकारने चुराडा केला. त्यामुळे आम्ही यापुढे शेतात गांजा पिकवायचा का, असा सवाल राज्यातल्या संतप्त कांदा उत्पादकांमधून उपस्थित केला जातोय.
कांद्याच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवता यावं, यासाठी केंद्र सरकारनं कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. परिणामी कांद्याचे भाव पुन्हा एकदा गडगडले. चांगले पीक आलं, की या पिकाच्या रुपाने हातातोंडाशी आलेला घास एक तर सरकार किंवा निसर्ग हिरावून घेतो.
यंदाच्या प्रचंड पावसामुळे कांद्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. मात्र केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांचं आर्थिक नियोजन पूर्णत: कोलमडलंय.
एकीकडे निसर्ग लाथाडतो आहे आणि दुसरीकडे केंद्र सरकार अजब निर्णय घेऊन कांदा उत्पादक शेतकर्यांचं जगणं कठीण करत आहे. ‘आई जेवायला देईना आणि बाप भीक मागू देईना’ अशा दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकर्यांनी शेतात गांजा पिकवायचा का, अशी विचारणा कांदा उत्पादक शेतकरी करताहेत.