बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पा’चे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवारसाहेब यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले

708
  • आशिया खंडातील सर्वात मोठा नागरी पुनर्वसन प्रकल्प असलेल्या मुंबईतील वरळी, परळ व नायगाव येथील ‘बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पा’चे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवारसाहेब यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. या प्रकल्पाचा शुभारंभ रिमोट कंट्रोलद्वारे ई-इनॉगरेशन द्वारे करण्यात आला. जांबोरी मैदान, वरळी येथे आयोजित या कार्यक्रमास महाविकास आघाडीतील विविध मान्यवर मंत्री व पदाधिकारी उपस्थित होते.
  • स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुमारे १०० वर्षांपासून मुंबईतील बीडीडी चाळींच्या इमारतीतील नागरिकांचे तीन-चार पिढ्या वास्तव्य आहे. या १६० चौरस फुटांच्या घराच्या मोबदल्यात त्यांना ५६४ चौरस फुटाचे नवे मालकीहक्काचे घर विनामूल्य मिळणार आहे. या प्रकल्पामध्ये वरळी, परळ व नायगाव येथील एकूण १९५ बीडीडी इमारतींचा समावेश असणार असून वरळीतील १२१ इमारतींच्या पुनर्विकासाचे काम हे आजपासून सुरू करण्यात आले. बीडीडी चाळीतील लाभार्थी रहिवाशी तसेच अनेक पोलिस सेवेतील या चाळींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांनाही या प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे.
  • या प्रकल्पाचा धुरा खांद्यावर वाहणारे महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री मा. श्री. जितेंद्र आव्हाड याप्रसंगी म्हणाले की, सध्या कोरोना संक्रमणामुळे आपण हा कार्यक्रम मर्यादित स्वरूपात घेत आहोत, जर असे नसते तर आज या जांबोरी मैदानात बीडीडी चाळीतील रहिवाशांची भलीमोठी गर्दी पाहायला मिळाली असती. बीडीडी चाळीला असलेल्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचाही त्यांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व क्रिकेटपटू रामनाथ पारकर यांच्या पदस्पर्शाने पावन हा परिसर भविष्यातही अजरामर राहिलं.
  • महसूल तसेच सार्वजनिक बांधकाम विभागही या प्रकल्पासाठी इच्छुक होते. परंतु बीडीडी चाळीचा विकास हा मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत व्हावा असा पवारसाहेबांचा आग्रह व सूचना होत्या. बीडीडी परिसरातील पोलिसांच्या घरांचाही पुनर्विकास या प्रकल्पातून होणार आहे. तसेच लाभार्थ्यांना ३६ महिन्यांमध्ये घरांच्या चाव्या मिळतील असेही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.
  • या कार्यक्रमासाठी सर्वश्री महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, उद्योजकता विकास मंत्री नवाब मलिक, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, प्रकल्पातील सहयोगी व स्थानिक विधिमंडळ लोकप्रतिनिधी म्हणून पर्यटन-पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here