दोन दिवसांपूर्वी नित्यानंदने एक व्हिडिओ जारी केला आहे.
बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि फरार असलेला स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु स्वामी नित्यानंद हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नित्यानंदने उद्या म्हणजेच गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आपले चलन लाँच करणार आहे. दोन दिवसांपूर्वी त्याने ‘रिझर्व्ह बँक ऑफ कैलास’ या नावाने आपल्या बँकेची स्थापना केल्याची घोषणा केली आहे.
दोन दिवसांपूर्वी नित्यानंदने एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये त्याने स्वत:ची बँक उघडण्याची घोषणा केली आहे. तसेच, गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण चलन जाहीर करणार असल्याचा दावाही त्याने या व्हिडिओमध्ये केला आहे. याशिवाय, येथील सर्व कामे कायद्यानुसारच करीत आहे. तसेच, आपल्या देशाचा पासपोर्टही बनविला असून तेथे आर्थिक व्यवस्थादेखील तयार केली जात आहे, असे नित्यानंदने म्हटले आहे.
नित्यानंद सध्या मेक्सिकोजवळील बेलाइज् येथे आहे, असे म्हटले जाते. इंटरपोलबरोबरच कर्नाटक आणि गुजरात पोलीसही नित्यानंदचा शोध घेत आहेत. दरम्यान, अमेरिकेतील इक्वोडोर देशाजवळील एका बेटाला नित्यानंदने स्वत:चा स्वतंत्र देश ‘कैलास’ म्हणून घोषित केल्याचे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात जाहीर केले होते.
कोण आहे नित्यानंद?
नित्यानंद हा मूळचा तामिळनाडूचा आहे. त्याचे खरं नाव राजशेखरन असे आहे. २००० साली त्याने बंगळूरु शहराजवळ स्वत:चे आश्रम सुरु केले. तेव्हापासूनच तो चर्चेत आला. स्वत:ला ईश्वराचा अवतार मानतो. २०१० साली त्याच्यावर दोन मुलींचे अपहरण करुन त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी गुजरातमधील अहमदाबाद पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर बलात्कार प्रकरणात पौरुषत्वाची चाचणीचे प्रकरणही चांगलेच गाजले होते. गुजरात पोलिसांनी नित्यानंदने भारतामधून पलायन केल्याची माहिती न्यायलयाला दिली होती. कर्नाटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २०१८ साली नित्यानंदला जामीन मंजूर झाला. याचाच फायदा घेत तो देशातून पळून गेला.